पागोटेवासीयांचा सिडको कार्यालयावर मोर्चा


जेएनपीटी (वार्ताहर) - द्रोणागिरी नोड मधिल रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करावी यासाठी पागोटे ग्रामस्थांनी सिडकोच्या विरोधात काल मोर्चा काढला होता. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी सिडको कार्यालया बाहेर धरणे धरून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, दर्दशा झालेल्या रस्त्यांची १५ दिवसांत दुरूस्ती केली जाईल, ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले. उरण तालुक्यातील सिडको हद्दीतील द्रोणागिरी नोडमधिल नवघर ते एपीएम टर्मिनल या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावर नेहमी कंटेनर ट्रेलर सारख्या अवजड वाहनांची मोठी वाहतूक असते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे पागोटे ग्रामस्थांना अवघड झाले आहे. शाळेतील मुले, कामगार यांना यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे रस्ते दुरुस्त करावे यासाठी सिडकोला अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर पागोटे ग्रामस्थांनी गुरुवारी सरपंच ड भार्गव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता.


Box


पोलिसांनी हा मोर्चा सिडको कार्यालयाच्या गेटवर अडवल्यानंतर ग्रामस्थांनी गेटवर धरणे धरले. अखेर सिडकोचे कार्यकारी अभियंता भगवान साळवे यांनी येत्या १५ दिवसांत खड्डेमय रस्ते दुरूस्त केले जातील तसेच रस्त्याच्या बाजूचे फुटपाथ आणि दिवे यांची तात्काळ दुरूस्ती केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. यावेळी सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते.