शिवसेनेतील गटबाजीच्या राजकारणावर ‘आदेश भावोजींचा’ उतारा ...!


नवी मुुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई शिवसेनेतून गणेश नाईक यांना बाहेर पडून आज 20 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र या 20 वर्षात येथील शिवसेनेवर नेतृत्त्वाअभावी चाचपडत राहण्याची वेळ आली असून कधी स्व. आनंद दिघे तर कधी विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे या ठाण्यातील नेत्यांमार्फत संघटनेला उभारी देण्याचे प्रयत्न आजवर करण्यात आले. या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ठाण्यातील नेत्यांनाही नवी मुंबईकडे लक्ष द्यायला कधी जमले नाही आणि नवी मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांपैकी कुणाला नवी मुंबई शिवसेनेची कमान सांभाळता आलेली नाही. प्रत्येकजण स्वत:ला नेता, पदाधिकारी समजू लागल्यामुळे काँग्रेसप्रमाणेच येथील शिवसेनेलाही नेतृत्वाची मोठी उणीव आहे. गटातटाच्या राजकारणामुळे नवी मुंबई महापालिका निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर आता शिवसेनेला महिला वर्गाची करमणूक करण्यात हातखंडा असणार्‍या आदेश भावोजींवर प्रचाराची धुरा देण्याची वेळ आली आहे. ‘खेळ मांडियेला’ या पैठणी शोच्या माध्यमातून आदेश भावोजी करमणुकीच्या माध्यमातून शिवसेनेचा व पर्यायाने महाआघाडीचा प्रचार करणार असून याची सुरुवात शनिवारी कोपरखैरण्यापासून करण्यात आली. 
कोपरखैरणे विभागातील शिवसेना नगरसेवकांनी या खेळासाठी आर्थिक भार उचलून एकप्रकारे प्रचाराचा श्रीगणेशा केला. शिवसेनेकडे आजही ठाणे जिल्ह्यात चांगले वक्तृत्व असणार्‍या नेत्यांची वाणवा आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे हे उत्तम पक्ष संघटक असले तरी मतदारांवर प्रभाव पाडणारे वक्तृत्व या दोघांकडेही नाही. कार्यकर्ता बैठकीतील संवादमय भाषण आणि नागरिकांच्या गर्दीपुढचे भाषण यामधील फरक या दोन्ही नेत्यांना आजवर लक्षात घेता आलेला नाही. नवी मुंंबईतील नेत्यांपैकी अभ्यासू वक्ते म्हटले तर उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या वक्तृत्वात अभ्यासूपणा जाणवतो. मात्र या दोन्ही नेत्यांमध्येही विधानसभा निवडणूकीपासून विळ्या-भोपळ्याचे वैर झालयं. जिल्हा प्रमुख व्दारकानाथ भोईर स्थानिक प्रकल्पग्रस्तांमधील एक निष्ठावंत शिवसैनिक व अभ्यासू वक्ते आहेत, परंतु त्यांनाही एका मर्यादेत ठेवण्यात आल्याने प्रचार सभांमधून उपनेते विजय नाहटा, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे यांच्यावरच भाषणे आणि त्याव्दारे प्रचाराची भिस्त आहे. मात्र या तिन्ही नेत्यांमध्ये कार्यकर्ते, मतदार,नागरिक यांना खिळवून ठेवण्याचे कसब नाही. राज्याचे एक बडे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे वलय असले तरी नवी मुंबई शहर, महापालिका येथील विकास याबद्दल त्यांचा फारसा अभ्यास असल्याचे कधी वक्तृत्वातून जाणवलेले नाही. गेल्या पाच वर्षात जनता दरबार भरविण्याचीही त्यांनी कधी तसदी घेतलेली नाही. त्यामुळे जनतेशी संवाद अथवा येथील सामाजिक संस्था, संघटना, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती, अधिकारी, पत्रकार यांच्यासाठीही पालकमंत्री फक्त नावालाच ओळखी पुरते ठरले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांमध्ये विश्‍वास निर्माण करु शकेल अशा नेतृत्वाची मोठी गरज शिवसेनेपुढे आहे.
 नवी मुंबई मनपा सभागृहात अभ्यासपूर्ण बोलणारे काही नगरसेवक शिवसेनेत आहेत. मात्र प्रभागाच्या बाहेर यापैकी कुणाचेही वलय नाही किंवा त्यांना मानणारा वर्गही नाही. याशिवाय संघटनेतही अशा वक्त्यांना दुय्यमच ठेवल्या गेलयं. संघटन पातळीवर कुणाचा कुणावरही विश्‍वास नसल्याने जिल्हाप्रमुखाचा गट वेगळा तर शहरप्रमुखाचा वेगळा असे चित्र आहे. शहर प्रमुख उपनेत्याच्या गटात राहून संघटनेवर वर्चस्व प्रस्थापित करत आहेत तर जिल्हाप्रमुखांना मात्र पध्दतशीरपणे बाजुला सारण्याचे कामही सुरु आहे. या सर्व गटबाजीच्या वातावरणात कालपर्यंत अन्य पक्षात असणारे आणि शिवसेनेसाठी कायम भ्रष्टाचाराच्या टिकेचे लक्ष्य ठरलेले काही बाहुबली नगरसेवक सध्या शिवसेनेच्या आश्रयाला येत आहेत. या सर्वांनीच कायम सत्तेचा स्वाद घेत आपल्या विभागात पक्ष संघटनेपेक्षा स्वत:चेच प्रस्थ निर्माण करण्यावर भर दिलायं. प्रत्येकाला शिवसेनेत प्रवेश करुन महाआघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळवायचा आहे आणि प्रत्येकालाच कुटूंबासाठी किमान 2 ते 3 अथवा 4-4 उमेदवार्‍या हव्या आहेत. यासाठी म फंडफच्या नावाखाली वाट्टेल ती आर्थिक बोली लावण्याची अनेकांची तयारी असून यामुळे आजवर शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन आंदोलन करणारा, उपक्रम राबविणारा कार्यकर्ता मात्र हवालदिल झालायं. या सर्व पार्श्‍वभूमीवर कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामध्ये पुन्हा शिवसेनेबद्दलची निष्ठा, प्रेम, आपुलकी यांची बीजे रोवण्याची जबाबदारी आता आदेश बांदेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या खेळासाठी लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात असून विद्यमान नगरसेवक, उमेदवारी इच्छुक आणि पक्षात येणार्‍या अन्य पक्षातील आयाराम नगरसेवकांना यासाठी खिसा मोकळा करावा लागत आहे. गेल्या महापालिका निवडणूकीत सुध्दा नामदेव भगत, किशोर पाटकर, विलास भोईर, एम.के. मढवी या आर्थिक बाहुबली नगरसेवकांवर आदेश भावोजींच्या पाहुणचाराची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. यावेळीही अन्य पक्षातून येणार्‍या उमेदवारी इच्छुकांवर आदेश भावोजींच्या पाहुणचाराची जबाबदारी टाकली जाणार असून एकदा पाहुणचार पदरी पडला की आदेश भावोजी पण समोरच्या जमावापुढे शिवसेना आणि पक्षनिष्ठा याचे धडे देण्यात कुठलीही कसूर सोडत नाहीत. अशावेळी शिवसेनेशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या परंतु भावोजींच्या पाहुणचाराची क्षमता नसलेल्या ज्येष्ठ शिवसैनिक, पदाधिकार्‍यांना आपल्यामधील आर्थिक क्षमतेची ‘उणीव’ जाणवल्याशिवाय राहत नाही.