वाशी पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी आत्महत्या करणाऱ्या गृहस्थाला वाचविले


वाशी (प्रतिनिधी) - वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या एका गृहस्थास वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केदार व त्यांचे इतर सहकारी पोलीस कर्मचारी यांनी यांनी पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. दरम्यान, पोलीस हवालदार केदार यांनी आपला जीव धोक्यात घालून सदर गृहस्थाला पाण्यातून वेळीच बाहेर काढल्याने होणारी अघटित घटना टळून सदर गृहस्थाचे प्राण केदार यांनी वाचविले आहेत. केदार यांच्या या कामगिरीचे सध्या कौतुक केले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका गृहस्थाने आत्महत्या करण्यासाठी वाशी खाडी पुलावरून पाण्यात उडी मारली. सदरचा हा प्रकार तेथे तैनात असलेल्या पोलीस हवालदार केदार यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्याकडील कसब पणाला लावत सदर गृहस्थाला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. दरम्यानयापूर्वी वाशी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रोहन बगाडे यांच्यासह पोलीस नाईक बसरे व तांबे यांनी वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या एका महिलेचा जीव वाचविला आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केदार यांनी एका गृहस्थास पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचविला.