नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरणात नवनवीन चढउतार येत असतानाच काल भाजपच्या 6 आजी-माजी नगरसेवकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली असून हे सहा जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. यामध्ये नगरसेविका सलुजा सुतार, शशिकला भोलानाथ पाटील, शुभांगी ज्ञानेश्वर पाटील, हे तिघे विद्यमान नगरसेवक तर चंद्रकांत पाटील, राजू शिंदे, संदीप सुतार हे तिघे माजी नगरसेवक यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.
नवी मुंबईतील गणेश नाईक यांचं महत्व कमी करण्यासाठी महाविकासआघाडीच्या माध्यमातून नुकताच वाशीत महाविकास आघाडीचा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नवी मुंबईत राज्याप्रमाणे बदल करण्यासाठी नेते मंडळीने कार्यकर्त्यांना आव्हान केले होते. त्यानंतर आता थेट नाईक गटातील नगरसेवकांनाच सुरुंग लावण्यात आल्याचं दिसत आहे.
नवी मुंबईच्या तुर्भे भागातील भाजपचे 4 नगरसेवक काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. यात सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगिता वास्कर, मुद्रिका गवळी या चार भाजपच्या नगरसेवकांचा समावेश होता. या सर्वांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. विशेष म्हणजे सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थिती दर्शवून त्यानी सुरेश कुलकर्णी यांचं कौतुक करत तुर्भेमधील झोपडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असंही आश्वासन दिलं होतं. दरम्यान, भाजपचे 4 नगरसेवक यापूर्वीच शिवसेनेत जात असतानाच आता पुन्हा 6 आजी माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली फूट भाजपच्या काळजीत भर टाकणारी आहे.
भाजपचे 6 आजी माजी नगरसेवक ना.अजित पवारांंच्या भेटीला!