नवी मुंबई (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय मराठी राजभाषा दिनानिमित्त शिरवणे येथील नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक १५ व शाळा क्रमांक १०१ येथे काल आयोजित कार्यक्रमात या शाळांतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाची व दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करण्याची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व मावळ्यांच्या वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरल्या. नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली माय मराठी ही नाटिका, विक्रम पाटील यांनी गायलेला अफजल खानाचा वध हा पोवाडा तर स्वाती कुंभार हिने गायलेल्या महाराष्ट्राच्या शूर वीरांनो या गीताने उपस्थितांची वाहवा मिळविली. ओव्या, अभंग, पोवाडा, भाषणे, नृत्ये, नाटिका या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात १००हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रभारी मुख्याध्यापिका तन्वी सुर्वे व मंगल भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात शिक्षिका रंजना साळी यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा प्रवास व सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली तर वर्तना बांगर यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त के ले. कलाशिक्षक अमृत पाटील नेरुळकर यांनी सादर केलेल्या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
मराठी भाषेचे संवर्धन, वापर करण्याची शालेय विद्यार्थ्यांनी घेतली शपथ... शिरवणेतील शाळेत मराठी राजभाषा दिन साजरा