रोडपाली ग्रामस्थांचा कळंबोलीतील सिडको कार्यालयावर मोर्चा

कळंबोली (वार्ताहर) - रोडपाली गाव येथील सेक्टर 17 भूखंड क्र. 77, याठिकाणी असलेले लोकनेते दि.बा. पाटील क्रिडा मैदान हे येथील ग्रामस्थ खेळासाठी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरत आहेत. मात्र सिडको प्रशासनाने गेल्या कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. आजमितीस खेळाचे मैदान आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येथील ग्रामस्थांसाठी जागाच शिल्लक राहिली नसल्याने रोडपाली ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने काल कळंबोली येथील सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित अधिकार्‍यांना याबाबत जाब विचारत सदर भूखंड क्रीडा व इतर कार्यक्रमांसाठी आरक्षित करावा अशी मागणी करण्यात आली. याबाबत पनवेल महापालिका विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल महापालिका प्रशासन नगरसचिव कार्यालय यांना दि 22 नोव्हेंबर 1017 आणि 01 फेब्रुवारी 2018, आयुक्त कार्यालय पत्र तसेच दि.28 नोव्हेंबर 2017 रोजी लेखी पत्र देऊन सिडको नोडमधील रोडपाली, खारघर, कामोठे, तळोजा एमआयडीसी येथे क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भूखंड आरक्षित करण्यात यावा अशी मागणी करून त्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. तसेच ग्रामस्थांची हि मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत राहून प्रयत्न करत राहीन अशी ग्वाही दिली आहे. या मोर्चाप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील ,जेष्ठ समाजसेवक आत्माराम पाटील, नगरसेवक गोपाळ भगत, उपमहापौर जगदीश  गायकवाड, नगरसेवक सतीश पाटील, मा.जि .प.सदस्य महादेव पाटील, काँग्रेस युवा नेते सुदाम पाटील, काँग्रेस युवा नेते मेघनाथ म्हात्रे, रिपब्लिकन सेना अध्यक्ष जीवन गायकवाड, नगरसेविका प्रियाताई भोईर, नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेवक विजय खानावकर, नगरसेविका विद्याताई गायकवाड, मा.पं.स. सदस्य काशिनाथ पाटील, विजय भोईर, महादेव कदम, शेकाप युवा नेत्या सरस्वती काथारा इत्यादी उपस्थित होते.