मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी मुंबईत १८ मजली अलिशान टॉवर उभारण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील एका भूखंडावर टॉवर उभारण्याची शक्यता आहे. मलबार हिल परिसरात हा भूखंड असून, तो २,५८४ चौरस मीटरचा आहे. त्यावर सध्या 'पुरातन' बंगला असून, तो १०५ वर्षे जुना आहे. सचिवांच्या एका समितीनं ११९ कोटींचा प्रस्तावित खर्च असलेल्या या योजनेला मान्यता दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याचा जीर्ण अवस्थेतील 'पुरातन' बंगला पाडून त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येईल. त्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील १८ _मंत्र्यांना घरे देण्यात येतील. १०३३७.८० मीटर परिसरात टॉवर उभारण्यात येणार आहे. प्रत्येक मंत्र्याला मजल्यावर घर देण्यात येणार असून, ते ५७४ चौरस मीटर असेल. त्यात एक हॉल, चार बेडरूम, स्वयंपाक घर, ऑफिस, अतिथी सभागृह, बैठकीची खोली, दोन कर्मचारी खोल्या, स्टोरेज रूम आणि इतर सुविधा देण्यात येणार आहे. मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त पाहणे आणि भेटीसाठी आलेल्यांसाठी ये-जा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. ही योजना मान्यतेसाठी लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठवली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मंत्र्यांसाठी मुंबईत १८ मजली अलिशान टॉवर उभारणार
• Dainik Lokdrushti Team