पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणारे जेरबंद


नवी मुंबई (प्रतिनिधी)डोंबिवली येथे राहणाऱ्या जिग्नेश शहा नावाच्या एका गृहस्थाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडणा-या चौघा सराईत गुन्हेगारांना रबाळे पोलिसानी जेरबंद केले आहे रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महापे परिसरातील शिळफाटा रोडवर दि. १८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. आरोपीच्या ताब्यातून एक पिस्तुल,तीन काडतुसे व चाकू अशी हत्यारे व चोरीची इको कार पोलिसांनी हस्तगत केली आहेत. डोंबिवलीतील जिग्नेश शहा हे इको टॅक्सीने दि. १८ फेब्रुवारी रोजी डोंबिवली येथे आपल्या घरी जात असताना सदर कारमध्ये घणसोली रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात आधीच प्रवाशी म्हणून बसलेल्या आरोपींच्या टोळीने शहा यांना पिस्तुल सारख्या हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील पाकिटातील एक हजारांची रोकड तसेच तीन एटीएम कार्ड व पिन नंबर घेऊन तुातील एटीएम सेंटरमध्ये जावून ३६ हजारांची रोकड काढत नंतर जिग्नेश शहा यांना महापे परिसरातील शिळफाटा रोडवर कारमधून सोडून देत चोरटयांनी पलायन केले होते. या प्रकरणी शहा यांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान,रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक व इतर बाजूने तपास करून घणसोली घणसोली रेल्वे स्थानक सर्विस रोड परिसरात सापळे लावले असता, दि २४ फेब्रुवारी रोजी चौघा जणांना एका इको कारसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासात सदर लुटीच्या प्रकरणात चौघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न होऊन चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीविरोधात नाशिक येथे वर्ष २०१४ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असून एका आरोपी विरोधात रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आरोपींची ओळख परेड होणे बाकी असल्याने आरोपींच्या नावांबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली असल्याचे रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी विषयी बोलताना सांगितले