नवी मुंबईत केंद्र सरकारच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा काँग्रेसकडून निषेध


नवी मुंबई (प्रतिनिधी) केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने अनुसूचित जातीअनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय समाजातील करोडो जनतेला आरक्षणापासून दूर करून त्यांचे संसार उघड्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून केंद्र सरकारची ही भूमिका आरक्षण विरोधी असल्याचा काँग्रेसने नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी ओ.सी विभागाच्यावतीने कोकणभवन येथे धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. नवी मुंबई काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक व नवी मुंबई ज़िल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष दिगंबर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनानंतर काँग्रेसच्या एका शिस्टमंडळाने कोकण आयुक्तांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.केंद्र सरकार असंवैधानीक काम करत आहे. शासकिय, निमशासकिय पदावर काम करताना राज्य घटनेप्रमाणे आरक्षणाचा अधिकार आहे. परंतु, हा मौलिक अधिकार हिसकावून घेण्याचे काम सरकार करत आहे. या निर्णयातून देशातील आरक्षण हळूहळू कमी करण्याचा डाव असल्याचे काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उत्तरांचल सरकारविरोधात तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी या खटल्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आरक्षणाबाबत आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी, ओबीसींच्या हितासाठी ओबीसी प्रवर्गाची जनगणना करण्यात यावी, व त्यासाठी जनगणना २०२१ मध्ये ओबीसी गणनेचा जाती निहाय समावेश करण्यात याव्या अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत या बाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मार्च महिन्यापासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे नवी मुंबई ज़िल्हा काँग्रेस ओ.बी सी सेलचे अध्यक्ष दिगंबर राऊत यांनी सांगितले. सोमवारी सकाळी करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते कोकणभवन इमारतीसमोर जमले होते. यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्त्या लीना लिमये, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस सुदर्शना कौशिक, भारतीय काँग्रेस ओ बी सी सेलच्या भारती अणारे, नवी मंबई काँग्रेस महिला अध्यक्ष उज्वला साळवे, परिवहन सदस्य रणजित सिग _धलीवाल, नवी मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष अन्वर हवालदार, वाशी ब्लॉक अध्यक्ष किशोर पाटील, कोपरखैरणे ब्लॉक अध्यक्ष धोंडीराम पाटील, सरचिटणीस कमलाकर चौगुले, घणसोली ब्लॉक अध्यक्ष अभिजित मांढरे, बेलापूर ब्लॉक अध्यक्ष प्रशांत वाघ, सानपाडा ब्लॉक अध्यक्ष महेश पाटील, चंद्रकला नायडू, पूजा जैन, विजय पाटील आदीसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.