नवी मुंबई (प्रतिनिधी) - केद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिले जाणारे 'राष्ट्रपती पोलीस गुणवत्ता सेवा पदक' सन्मानीत तुर्भे वाहतुक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक किसन गायकवाड व तीन खाड्या पोहण्याचा विक्रम करणारा साहसी जलतरणपटू कु. तन्मय महेंद्र सुतार यांचा नवी मुंबई महापालिकेच्यावतीने काल सर्वसाधारण सभेत महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समितीचे सभापती नविन गवते, सभागृह नेते रविंद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, क्रीडा समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्षप्रतोद व्दारकानाथ भोईर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षप्रतोद अविनाश लाड, नगरसेवक शिवराम पाटील आदी उपस्थित होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तुर्भे वाहतुक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक किसन गायकवाड यांनी कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करताना बजावलेल्या कार्यतत्पर सेवेबद्दल लाभलेल्या राष्ट्रीय सन्मानाबद्दल पोलीस दलाचीच नव्हे तर नवी मुंबई शहराची मानही उंचावलेली आहे असा विशेष उल्लेख करीत महापालिका सभागृहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच यावर्षीच्या १७ जानेवारी रोजी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १२ किमी अंतर, ३१ जानेवारी रोजी धरमतर ते रेवस हे १८ किमी अंतर तसेच ३ फेब्रुवारी रोजी करंजा पोर्टमांडवा बीच हे ९ किमी अंतर पार करणारा साहसी जलतरणपटू कु. तन्मय सुतार याने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल सभागृहाच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.
पोलीस निरीक्षक किसन गायकवाड. जलतरणपट कु. तन्मय सुतार यांचा महापलिकेतर्फे सन्मान