तुर्भे (वार्ताहर) - स्वावलंबी सामाजिक सेवाभावी संस्था आणि संकल्प युथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित तरुणीला हनुमान नगर तुर्भे नाका येथे मुख्य चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हनुमान नगर ते तुर्भे नाक्यापर्यंत काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये तुर्भे परिसरातील शेकडो महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदविला होता. या कँडल मार्चमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
पीडिता अंकिता पिसुडू या तरुणीला श्रद्धांजली वाहताना यावेळी महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पीडित अंकीताच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळणार्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, त्यालाही आम्ही उभा जाळू आशा पद्धतीच्या संतप्त प्रतिक्रिया महिलांतून आल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, महिलांनी आपल्या मुलींना स्वतःचे रक्षण करण्यासाठी शिक्षणा बरोबरच कराटेचेही शिक्षण द्यावे तसेच अशा प्रकारे कोणत्या मुलीला किंवा महिलेला कोणी पुरुष त्रास देत असेल तर जवळच्या पोलीस पोलीस ठाण्यात तसेच घरच्या सदस्यांना याबाबतची माहिती द्यावी किंवा परिसरातील शिवसैनिकांना कळवावे. महिलांना त्रास देणार्यास वठणीवर आणण्याचे काम शिवसैनिक करतील असे पाटील म्हणाले. या श्रध्दांजली सभेचे आयोजन शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे, तुर्भे विभाग प्रमुख तय्यब पटेल, समाजसेवक विनोद पाचपिंडे यांनी केले होते. या कँडल मार्चमध्ये शिवसेनेच्या महिला संघटक शांताबाई कदम, रिपाइंचे विनोद वानखेडे, विजय गायकवाड, भारिप बहुजन महासंघाचे तुर्भे विभाग अध्यक्ष दिनेश पुटगे, कौशल्य परतवाघ, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे तुर्भे विभाग प्रमुख प्रवीण वाघमारे, रॉयल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश कोळी, युवा सेनेचे अमोल टेंकाळे आदी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
हिंगणघाट येथील पीडित तरुणीला तुर्भे नाका येथे श्रद्धांजली