नवी मुंबई (प्रतिनिधी) - वाशी सेक्टर-१७ येथील स्व. मिनाताई ठाकरे उद्यानातील ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्राचे काम काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राजकीय हेतु ने बंद पाडले असल्याचा आरोप येथील स्थानिक नगरसेविका दयावती शेवाळे यांनी केला आहे. आपली सुख दु:ख वाटुन घेण्यासाठी तसेच चार क्षण विरंगुळयाचे मिळावेत यासाठी स्व. मिनाताई ठाकरे उद्यानात ज्येष्ठ नागरीकांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र बांधण्याचे काम २०१७ मध्ये पालिकेकडून मंजुर करुन घेतले होते. या केंद्राचे काम जवळ जवळ ७० टक्के पुर्ण झाल्यानंतर काँग्रेसच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यानेच ज्येष्ठांच्या सुविधेसाठी होणान्या या विरंगुळा केंद्राला विरोध केला असुन नगरविकास मंत्री तथा पालकमंत्र्यांकडे संबंधीत राजकिय पदाधिका-याने व त्यांच्या सहका-यांनी घेतलेल्या हरकतीनुसार सदरचे काम थांबवले असल्याचेही नगरसेविका दयावती शेवाळे म्हणाल्या. नगरसेविका शेवाळे यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा सर्व रोख माजी नगरसेवक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचे विरोधात होता. वाशी सेक्टर-१७ येथील स्व. मिनाताई ठाकरे उद्यानातील ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्राचे काम थांबल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दयावती शेवाळे यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. शहरातील ज्येष्ठांसाठी निवांतपणे बसण्यासाठी तसेच काही बैठे खेळ त्यांना खेळता यावेत यासाठी नवी मुंबई महापालिकेने सन २०१२ साली विरंगुळा केंद्र बांधण्याचे धोरण मंजुर करुन अमलात आणले. यानुसार शहरातील उद्यानामध्ये अशी विरंगुळा केंद्रे विविध ठिकाणी बांधण्यात आली. नोंदणीकृत महाराजा ज्येष्ठ नागरीक संस्थेने सेक्टर-१७ मधील ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची मागणी केली होती. त्यानुसार सदर काम महासभेमध्ये मंजुर करुन घेतले. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या. स्थायी समितीच्या बैठकीत या कामाला रितसर मंजुरीही घेतली व या कामाचा कार्यादेश काढण्यात आला. सदर कार्यादेशानुसार ठेकेदाराने ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राचे कामही सुरु केले. मात्र काम पुर्णत्वास येत असताना या राजकिय पदाधिकाऱ्याने महापालिका आयुक्तांना काम बंद करण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडी सुचनेनुसार सदरचे काम काही काळ थांबवण्यात आले असे नगरसेविका दयावती शेवाळे यांनी सांगितले. दरम्यान सदरचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी २५० ज्येष्ठ नागरीकांनी महापालिकेला सह्यांचे निवेदन दिले असून सदरच्या थांबलेल्या कामामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये खुप मोठया प्रमाणात रोष निर्माण होत त्याचा उद्रेक होईल याची जाणीव होताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते काम पुन्हा सुरु करण्यास संबंधीत ठेकेदारास सांगितले. त्यानंतर स्व. मिनाताई ठाकरे उद्यानात विरंगुळा केंद्राचे कामही सुरु झाले. आता ते पूर्णत्वाला जात असताना या राजकिय पदाधिकाऱ्याने व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे हरकत घेतल्याने सदरचे काम महापालिकेने दि.२५ फेब्रुवारी २०२० रोजी ठेकेदाराला पत्र पाठवुन थांबविले आहे, अशी सविस्तर माहितीच नगरसेविका दयावती शेवाळे यांनी दिली.
box
उद्यानात विरंगुळा केंद्र नको असे या राजकिय पदाधिकारी याचा आक्षेप आहे. परंतु महापालिकेच्या धोरणानुसार शहरातील ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रे उदयानामध्येच बांधण्यात आली आहेत. त्यावेळी या राजकिय पदाधिकऱ्याने कधीही आक्षेप घेतला नाही. हे राजकिय पदाधिकारी आता निवडणूकीसाठी राजकारण करीत असुन ज्येष्ठांसाठी आवश्यक असलेल्या विरंगुळा केंद्राचा बळी त्यासाठी देत आहेत. मात्र सदरचे विरंगुळा केंद्र लवकरात लवकर बांधून पूर्ण करावे व सेक्टर-१७ मधील ज्येष्ठांसाठी ते खुले करावे, अशी मागणी असल्याचे नगरसेविका दयावती शेवाळे यांनी सांगितले. या आरोपांचा संपूर्ण रोख माजी उपमहापौर अनिल कौशिक यांच्याविरोधात होता. त्यांच्याच तक्रारीवरुन हे काम थांबल्याचे यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.