नवी मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई, पनवेल तसेच तळोजा भागात वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाच्या या गंभीर समस्येबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर ठिकाणी जागरुक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याबाबत काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या धुतराष्ट्र भूमिकेच्या निषेधार्थ काल खारघर तळोजा कॉलनी वेलफेअर असोसिएशनने बेलापूर मधील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा नेत तेथील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. नवी मुंबई, पनवेल तसेच तळोजा भागात वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकारामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना विविध व्याधींचा त्रास सहन करावा लागत आहे. खारघर आणि तळोजा रहिवासी संकूला जवळ केमिकल औद्योगिक वसाहत देखील आहे तसेच या भागात मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्याची कामे सुरू आहेत. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात धूलिकण निर्माण होण्यासह वायू प्रदूषणातही वाढ झाली आहे. याबाबत वारंवार तक्रारी येथील नागरिक करत असतात, परंतु महाराष्ट्र प्रदूषण मंडळ याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने खारघर तळोजा कॉलनी वेलफेअर असोसिएशनकडून काल बेलापूर मधील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेऊन प्रदषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात घोषणा बाजी केली. या प्रदूषणामुळे मुलांसह नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिक आदी सर्वांचे आरोग्य धोक्यात आले असून, हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नियमावली बनवण्याची मागणी यावेळी मोर्यात सहभागी झालेल्या नागरिकांनी केली आहे. ___ याबाबत बोलताना नागरिकांनी सांगितले कि, पनवेलमध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीतील होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे, पीएमओ कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही तळोजातील जल आणि वायू प्रदूषण काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे परिसरातील वसाहती आणि गावे त्रस्त आहेत. तळोजातून वाहणारी कासाडी आणि मलंग नदी आहे की नाला असा प्रश्न विचारण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून सीईटीपी म्हणजेच सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह आहे. मात्र एका स्थानिक नगरसेवकाने इथल्या प्रदूषणाची तक्रार थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे केल्यामुळे लवादानेही संबंधीत यंत्रणांचे कान टोचत प्रदषण करणाऱ्या कंपन्या व घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही येरे माझ्या मागल्याप्रमाणे परिस्थिती असल्याने या प्रकाराकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्हालाहा मोर्चा काढावा लागला असल्याच्या भावना मोर्चेकरी नागरिकांनी व्यक्त केल्या .
प्रदूषणाची समस्या काही केल्या कमी होईना! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर नागरिकांची धडक