नेरुळ एमआयडीसीत ३ कंपन्यांना आग/

दोन कंपन्या खाक
  नवी मुंबई ( प्रतिनिधी)-   नवी मुंबईत सेक्टर ३६ , सीवूड्स नेरूळ येथील सी होम्स को. ऑप. हौ. सोसा. या २१ मजली इमारतीला नुकतीच आग लागून घरांचे नुकसान होण्याबरोबरच आग विझविताना नवी मुंबई अग्निशमन दलाचे ७ जवान जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच काल सकाळच्या सुमारास नेरुळ एमआयडीसी येथील टी टी सी ब्लॉक मधील एकाच ठिकाणच्या तीन कंपन्यांना आग लागण्याची घटना घडली. या आगीत दोन कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आग लागून त्या खाक झाल्या. विशेष म्हणजे कंपन्यांना आग लागलेली असतानाही संबंधीत कंपनी व्यवस्थापनांऐवजी एका जागरूक नागरिकाने  नेरुळ एमआयडीसी अग्निशामक दलास याबाबतची माहिती दिली. त्यामुळे अग्निशामक पथकास घटनास्तळी पोहचण्यास विलंब झाला. कंपन्यांच्या या निष्काळजीपणाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र अशी एकंदरीत परिस्थिती असतानाही नेरुळ एमआयडीसी अग्निशामक दलाचे उपअग्निशमन अधिकारी सुरेश कोल्हार यांनी इतर ठिकाणचे  अग्निशमन जवान व बंबांच्या मदतीने पाऊण तासात आग आटोक्यात आणली.




                       नेरुळ एमआयडीसी येथील टी टी सी ब्लॉक मधील आग लागलेल्या तीन कंपन्यांमध्ये मायक्रोपॅन फार्मासिटिकल, इंडियाना ड्राईव्ह अँड फार्मासिटिकल व रेडियान्स मेडीकेअर या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी मायक्रोपॅन फार्मासिटिकल व इंडियाना ड्राईव्ह अँड फार्मासिटिकल या दोन कंपन्या मोठ्या प्रमाणात जळून कंपनी मालकांचे नुकसान झाले आहे. तर  रेडियान्स मेडीकेअर ही कंपनी जवळपास २० % जळाली आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच कामगार वेळीच बाहेर पडल्यामुळे या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचे नेरुळ एमआयडीसी अग्निशामक दलाचे उपअग्निशमन अधिकारी सुरेश कोल्हार यांनी सांगितले. जर आम्हाला या घटनेबाबत कंपन्यांकडून वेळीच माहिती मिळाली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी झाली नसती असेही ते म्हणाले. विलंबाच्या माहितीमुळे या आगीमागील कारणही समजू शकले नाही. नेरुळ एमआयडीसी अग्निशमन दलाच्या २ बंब, नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाचे २ बंब, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन व रबाळे एमआयडीसी अग्निशमन येथील १ अश्या एकूण ६ बंबांच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली.
---------------------