औरंगाबाद - पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या राडेबाज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या खासुप्रिया सुळे यांनी चांगलीच दमबाजी केली आहे. 'माझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केला आहेपक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे,' अशा शब्दात सुळे यांनी या गोंधळी कार्यकर्त्यांना दम भरल्याचं सूत्रांनी सांगितलं. खा.सुप्रिया सुळे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. पैठण येथे काल कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असतानाच राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून आली. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देत कार्यक्रमात गोंधळ घातला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने एकच गोंधळ झाला आणि उपस्थितांची धावपळ उडाली. त्यामुळे सुप्रिया सुप्रिया सुळे यांना मध्येच भाषण थांबवावं लागलं. त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, तरीही घोषणाबाजी सुरूच राहिली. उलट कार्यकर्ते राडेबाजीवर उतरल्याने सुळे प्रचंड संतापल्या आणि त्यांनी थेट गोंधळी आणि बेशिस्त कार्यकर्त्यांना दमबाजीच केल्याचं सूत्रांनी सांगितलं. खा. सुप्रिया सुळे यांच्या या रौद्ररुपानंतर कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर सुळे यांनी वाकचौरे आणि गोर्डे या दोघांनाही कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून जायला सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत वाकचौरे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. पक्षाने गोर्डे यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे वाकचौरे समर्थक नाराज होते. मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होतेत्यामुळे हा राडा झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या मेळाव्यात कोणताही गोंधळ झाला नसल्याचा दावा वाकचौरे समर्थकांनी केला आहे. कार्यक्रमाला गर्दी प्रचंड असल्याने गोंधळ झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असावी, असा दावाही राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
माझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केलाय
• Dainik Lokdrushti Team