गुन्हेगारीचे वाढते आव्हान!

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील विविध प्रकारच्या घडणाऱ्या गुन्हेगारीबाबत नेहमीच चिंता व्यक्त होतांनाच गुन्हेगारीचे उघडकीस येणारे विविध प्रकारही अशा चिंतेत भर टाकत असतात. चोरी, लूटमार, अमली पदार्थांचा गैरव्यवहार, फसवणूक, महिलांवरील अत्याचारासंबंधी घटना, चेनचोरीपासून घरफोडी आणि आताच्या डिजिटल युगात बँकांमधून थेट पैसे वळते होण्यापासून ते लोकांची अमिष दाखवत वा विविध मार्गाचा वापर करीत ऑनलाईन फसवणूक करणे असे गुन्हे घडल्याचे पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार नोंदीतून स्पष्ट होत आले आहे. अलिकडच्या महिना-दीड महिन्याच्या कालावधीत घणसोली परिसरात अज्ञात व्यक्तींकडून वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकार घडले असून हा नवा प्रकार चिंतादायी असाच आहे. महिनाभरात ५०हून अधिक गाड्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार घडले असून चोरीच्या उद्देशाने या काचा फोडल्या जात असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. हे खरे असेलही, मात्र त्याचबरोबर कुठल्याशा दसऱ्याचे चांगले न बघवणं, असूया, अघोरी आनंद मिळवणं, दहशत पसरवणं, अंधश्रध्दा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे यासह अन्य कारणेही असू शकतात. पोलिसांत तक्रारी दाखल झाल्याने तपास होईल आणि याबाबत काही गुन्हेगारच हाती सापडले, त्यांनी कबुली दिली तर या मागचे सत्य अधिक उघड होईल आणि हे लोक कोण आहेत, किती जण आहेत, यासह अन्य प्रश्नांचीही उत्तरे मिळतील. घणसोली येथील डी मार्टसमोर असलेल्या रिद्धी-सिद्धी इमारतीसमोर व साई सदानंद नगर परिसरात हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. नेहमीप्रमाणे इमारतीबाहेर अनेक चालक आपली वाहने उभी करतात, परंतु मध्यरात्रीनंमतर अज्ञात व्यक्ती गाडीच्या व इंटर लॉक किंवा खिडक्यांच्या काचेवर दगडाने मारून गाडी उघडण्याचा प्रयत्न करतात; या मागे त्यांचा चोरीसह अन्य काही उद्दीष्ट्य असू शकतात. मात्र यात गाड्यांचे आणि वाहनचालकांचे नुकसान होत आहे. या प्रकारात काचा फोडणारी व्यक्ती ट्रक, टेम्पो, मिनी बस, मॅजिक वाहनांच्या काचा फोडत नाही. फक्त चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्याचे खास प्रकार का होतात, याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आतापर्यंत ५०हून अधिक गाड्यांचे अशा प्रकारे नुकसान झाले आहे. वाहनाचे नुकसान झाले की ते दुरुस्तीसाठी काही हजार रुपयांचा खर्च अपरिहार्य अशी स्थिती असल्याने वाहन चालकांना नाहक आर्थिक भूर्दंड पडत आहे. विशेष म्हणजे गाडीच्या काचा फोडल्यानंतर त्यात असणारे किमती साहित्य चोरले जात नसून फक्त पैसे पळवले जात आहेत, अशा तक्रारी वाहनचालकांच्या आहेत. मात्र सध्या या प्रकारांमुळे वाहनचालकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहेत आणि हे प्रकार घडत असल्याने वाहन चालकांची भीती त्यांना अधिक अस्वस्थ करीत असेल हेही खरेच. त्यामुळेच घणसोलीतील असे वाढते प्रकार लक्षात घेत अनेक वाहनचालकांनी एकत्र येऊन रबाळे पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार करीत चोरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. नवी मुंबईत खून, हत्या, आत्महत्या असे प्रकारही घडले असून पोलिसांचीही गुन्ह्यांचा तपास करतांना चांगलीच कसोटी लागत असावी. चिरनेर-रानसई रस्त्यालगत निर्जन ठिकाणी कच-याच्या खाणीत एका महिलेचा भोसकलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याची कालची घटना ताजी आहे तर तळोजा फेज-१; से.-९ येथील शिवकॉर्नर सोसायटीत भाडे तत्वावर राहणा-या उपाध्याय कुटुंबियांनी आर्थिक संकटातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनाही अतिशय गंभीर आहे. नवी मुंबई पोलिस गुन्हेगारांचा शोध घेतील, असा विश्वास बाळगतांनाच शहरातील गुन्हेगारीचे प्रकार आणि आव्हान वाढते आहे हेही तेवढच खरे!