नवी मुंबई (प्रतिनिधी) - माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासन व संबंधिताकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे बुधवारी तमाम माथाडी कामगारांच्या एकदिवसीय लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली होती. या संपास राज्यभरातील माथाडी कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संपामुळे सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे बाजारपेठा बंद होत्या. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटचा अपवाद वगळता इतर चारही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते तथा सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या लाक्षणिक संपाची व्युव्हरचना आखण्यात आली होती. माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व पुनर्रचित सल्लागार समितीवर युनियनच्या अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका करणे, विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, माथाडी मंडळात पूर्णवेळ चेअरमन/सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे, माथाडी ऍक्ट,१९६९ या अधिनियमाअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या माथाडी मंडळामार्फत माथाडी कामगारांच्या वेतनात राष्ट्रीयकृत बैंक, सहकारी बँक व पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची कपात न करण्याबाबत कामगार विभागाने काढलेला दि.०५ /०३ | २०१९ चा शासन निर्णय मागे घेणे, कळंबोली स्टील मार्केटमध्ये विविध सुविधा उपलब्ध करुन देणे, फॅक्टरीमध्ये माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होणे, विविध रेल्वे यात माथाडी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे, माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दर करणे, विविध माथाडी मंडळातील मे.एव्हीऑन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजिस इंडिया या कंपनीच्या संगणक प्रणालीव्दारे देण्यात येणारी सेवा खंडित केल्याबाबत निर्णय होणे, माथाडी हॉस्पीटलच्या कामाकाजाची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या चौकशीचा अहवाल घेणे व हॉस्पीटलचे कामकाज सुरळीत करण्यास सहकार्य देणे, कोल्हापूर माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांसंबंधी निर्णय होणे, गुलटेकडी मार्केट,पुणे येथील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक होणे, माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतुद करणे, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी समिती गठीत करणे, बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी/तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे, वडाळा येथिल माथाडी कामगारांची घरकुलातील अडचणी दूर करणे, नवीमुंबई परिसरात सिडकोमार्फत माथाडी कामगारांना घरे मिळणे आदी महाराष्ट्र शासन व संबंधिताकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला होता.
माथाडी कामगारांच्या लाक्षणिक संपास उत्स्फूर्त प्रतिसाद