तुर्भे (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक व कला महोत्सवात एकल गायन स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेच्या इंदिरानगर तुर्भे येथील शाळा क्रमांक-२५ मधील विद्यार्थीनी कुमारी प्रीती प्रकाश प्रधान हिने व्दितीय क्रमांक पटकाविला. प्रीती प्रकाश प्रधान हिच्या या कामगिरीबद्दल शिवसेना तुर्भे विभाग प्रमुख महेश कोटीवाले यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थिनी प्रीती प्रधान हिचे विशेष कौतुक केले. एका अत्यंत गरीब कुटुंबातील प्रीती प्रधान हिने गायनाच्या छंदाची जोपासना करून नवी मुंबई स्तरातून दसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना कोटीवाले यांनी यावेळी नमूद करत तिला आर्थिक मदतही केली. यावेळी प्रीती प्रधान या विद्यार्थिनीच्या पालकांसह शाळेचे मुख्याध्यापक सोपान सिनलकर, वर्गशिक्षक दिनकर यादव, ,कोलते, चौधरी आणि इतर शिक्षकवृंद, विद्यार्थी व अन्य पालक उपस्थित होते. इंदिरा नगर शिवसेना शाखाप्रमुख सिद्धाराम शिलवंत यांनी मुख्याध्यापक, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
एकल गायन स्पर्धेत इंदिरानगर तुर्भे महापालिका शाळा विद्यार्थीनीची कामगिरी