नवी मुंबई (प्रतिनिधी)- अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणाऱ्या सख्या चुलत भावाला मंगळवारी ठाणे न्यायालयातील पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी भादंवि कलम ३७६ (२)(एन) या कलमाखाली दोषी ठरवत दहा वर्षाचा कारावास आणि वीस हजाराचा दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. अरहंत जनार्दन सुनतकारी (२६) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून तो सानपाडा येथील रहिवाशी आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पीडित मुलीसह तिची आई आणि आजोबा फितूर झाले. मात्र मुलीने तिच्यावरील अत्याचाराची माहिती मैत्रीण आणि शाळेतील शिक्षिकेला दिली. शिक्षिका, डॉक्टर आणि पीडितेची मैत्रीण यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली आणि आरोपीला शिक्षा झाल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली. पीडित अल्पवयीन मुलगी नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील काकाच्या घरी राहत असून तिची आई मूळ गावी वर्धा येथे असते. नवी मुंबईतीलच एका नामांकित इंटरनॅशनल शाळेत ही मुलगी शिक्षण घेत आहे. दरम्यान, सप्टेंबर २०१७ पासून काकाच्या मुलाने तिच्याशी घरी गैरवर्तन करण्यास सुरवात केली होती. अत्याचार करणारा सख्खा चुलत भाऊ असल्याने मुलीने ही गोष्ट घरी सांगितली नव्हती. ऑक्टोबर महिन्यात शाळेला दिवाळीची सुट्टी लागली. त्यावेळी देखील ती घरी असताना चुलत भावाने तिच्यावर जबरदस्ती केली होती. त्यानंतर तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. काकाच्या घरी राहत असल्याने पीडित अल्पवयीन मुलीने या प्रकाराविषयी कोठच वाच्यता केली नाही. परतु पोटात दुखत असल्याचे तिने शाळेतील आपल्या मैत्रिणीला सांगितले. मैत्रिणीने ही बाब शिक्षिकेच्या कानावर घातली. शिक्षिकेने पीडितेला बोलावून घेत तिच्याकडे विचारणा केली असता, चुलत भावाने केलेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली आणि हा अत्याचाराचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीनंतर वर्ष २०१८ मध्ये आरोपीविरुद्ध सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं-२४ /२०१८ भादवि कलम ३७६, ३५४ पोक्सो कलम ३ एसी, ५ जेएलएन अनव्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. या खटल्यात एकूण सहाहून अधिक साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, न्यायालयात पीडितेसह तिची आई आणि आजोबा फितूर झाले. परंतु पीडितेची मैत्रीण, शिक्षिका आणि डॉक्टर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध झाला. ठाणे न्यायालयातील पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी आरोपीला दोषी ठरवीत दहा वर्षाचा कारावास आणि पाच हजाराचा दंड, भादंवि कलम ३५४ मध्ये ५ वर्षाचा कारावास, पाच हजार दंड, आणि इतरही वेगवेगळ्या कलमाखाली सात आणि दहा वर्षाची शिक्षा ठोठावली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज पाडवी हे तपास अधिकारी होते. विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे, पोनि गुन्हे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कारकुन पोलीस हवालदार विजय विशे यांनी सरकारी वकील संजय मोरे यांच्या कामकाजात विशेष मदत केली.
चुलत बहिणीवर अत्याचार... आरोपी भावास १० वर्षे कारावास