नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी काल स्थायी समितीपुढे सभापती नविन गवते यांच्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2019-20 चा सुधारित आणि सन 2020-21चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. नवी मुंबईकरांची करवाढीतुन मुक्तता करण्यात आली आहे. यात तब्ब्ल 3 हजार 850 कोटी रुपयांमधून 3848.91 कोटी रुपये विविध विकास कामांवर खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या जुन्या प्रकल्पाना चालना देणारे हे अर्थसंकल्पिय अंदाजपञक असे या अंदाज पत्रकांचे वर्णन केले जाऊ शकते. नवी मुंबईकरांची पुन्हा एकदा सलग 25 व्या वर्षी मालमत्ता व पाणीपट्टी करवाढीतून मुक्तता करण्यात आल्याने नागरिकांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. मात्र करवाढ होत नसल्यामुळे पाणीपट्टी वसुलीत 14 टक्के आर्थिक तूट होत असल्याचे प्रशासनाने कबुली देत भविष्यात पाणीकरात वाढ करण्याची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. याप्रसंगी सभागृह नेते रविंद्र इथापे, नगरसेविका सरोज पाटील, सचिव चित्रा बाविस्कर, नगरसेवक जयाजी नाथ तसेच इतर सर्व समिती सदस्य आणि अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड उपस्थित होते.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 95 नुसार सदर जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 1905. 69 कोटी व रु. 2369 .62 कोटी जमेचे आणि रु.3057 .54 कोटी खर्चाचे सन 2019-20 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1217. 76 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 3850 कोटी जमा व रु. 3848.91 कोटी खर्चाचे आणि रु. 1.09 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2020-21 चे मूळ अंदाजपत्रक त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचेही अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या जुन्या प्रकल्पाना चालना देणारे हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक असे या अंदाजपत्रकाचे वर्णन केले जाऊ शकते.
माहे नोव्हेंबर 2019 अखेर रू. 251. 77 कोटी मालमत्ता कराची वसूली करण्यात आलेली आहे व मार्च-2020 अखेर रु. 700 कोटी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सन 2020-21 या वर्षामध्ये रु. 630 कोटी जमा होईल असा अंदाज आहे. शासन मान्यतेने मालमत्ताकर अभय योजना लागू करण्यात आली असून जानेवारी 2020 अखेरपर्यत रु.171 कोटी एवढा मालमत्ता कर, अभय योजनेअंतर्गत वसूल करण्यात आलेला आहे. प्रलंबित कर निर्धारणा व प्रलंबित वसूलीव्दारे उत्पन्न, शासनाचे सहाय्यक अनुदान व मुद्रांक शुल्क अनुदान मिळून एकत्रित सन 2020-21 करिता रू.1250 कोटी उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी 103 दिव्यांगांना, अत्यल्प शुल्क आकारुन जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, दिव्यांगांमार्फत प्राप्त 714 अर्जांची प्रतिक्षा यादी तयार करून सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आलेली आहे. परवाना विभागामार्फत सन 2019-20 मध्ये नोव्हेंबर 2019 पर्यत रु. 5.30 कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे, व मार्च 2020 अखेर रु. 6. 45 कोटी महसूल प्राप्त होणे अंदाजित आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या 154 बसथांब्यांवरील जाहिरातींचे हक्क देणे, महापे उड्डाणपूल पॅनलवर जाहिरात करणे अशा ठेक्यांपासून 7 वर्षांच्या कालावधीत महानगरपालिकेस एकूण रक्कम रू.57. 08 कोटी एवढे भरीव उत्पन्न प्राप्त होणार असून माहे नोव्हेंबर 2019 पर्यंत रु.3.83 कोटी इतके उत्पन्न प्राप्त झालेले आहे. मोरबे धरण प्रकल्पातुन सध्या पुरविण्यात येणार्या पाण्यावर अत्यंत कमी पाणीपट्टी आकारण्यात येते. त्यानुसार पाणीपट्टीपोटी सन 2018-19 मध्ये रु.105. 24 कोटी इतकी जमा व रु.119. 58 कोटी इतका खर्च झाला आहे. पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या जमा-खर्चाचा विचार करता गतवर्षात रु.14. 34 कोटी एवढी तूट झालेली आहे. तथापि शासन निर्देशानुसार पाणीपुरवठा व्यवस्थेचा खर्च हा 100% पाणीपट्टी इ. उत्पन्नातून करणे आवश्यक आहे. शिवाय नागरिकांना इतर दर्जेदार सोयी सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक निधीची पूर्तताही अशा पाणीपट्टी व इतर कर दरवाढीतून करण्याचे विचाराधीन असून पाणीपट्टीचे दर सुरळीत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सन2019-20 मध्ये रु. 86. 07 कोटी जमा होतील अशी अपेक्षा आहे व सन 2020-21 मध्ये रक्कम रु. 115. 59 कोटींचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. त्यानुसार होणा-या वाढीव खर्चाची तरतूद सन 2020-21 च्या अंदाजात करण्यात आलेली आहे.
रस्ते हा शहराचा आरसा असतात हे लक्षात घेऊन प्रामुख्याने शहरातील सर्वात वर्दळीचा व मध्यवर्ती अशा ठाणे - बेलापूर मार्गाची अत्याधुनिक साधने व साहित्याचा वापर करून शाश्वत सुधारणा करण्याचे नियोजन आहे. अशाचप्रकारे नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून सुपरिचीत अशा पामबीच मार्गावर मिसींग लिंक प्रस्तावित आहे. दर्जेदार रस्ते बनविणे तसेच मूळ गांवठाणांमधील रस्त्यांचे टी.डब्ल्यू.टी. पध्दतीने क्राँक्रिटीकरण करण्याकरिता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच शहरातील पदपथ हे स्टँम्प क्राँक्रिटने बनविणे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रितीने होण्याकरिता गटारांची सुधारणा करण्याचा मानस असून त्याकरिता आवश्यक तरतूद करण्यात आलेली आहे. टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील 15 कि.मी. रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण करण्यात येत असून त्याकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहर गतीमानतेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करीत वाशी से.17 येथे महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत उन्नत मार्ग बांधणे, घणसोली ते ऐरोली पामबीच रस्त्यावर पूल बांधणे, आग्रोळी तलाव ते कोकण भवन येथे उड्डाणपूल बांधणे व शहरातील आवश्यक ठिकाणी पादचारी पूल व भुयारी मार्ग बांधण्याकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे. अभिनव मसायन्स पार्कफ उभारण्याचे नियोजन नेरुळ से.19 ए, मध्ये वंडर्स पार्क येथील 8.50 एकर क्षेत्रात करण्यात आले आहे. या प्रकल्पाकरिता रु. 87.26 कोटी इतका खर्च अपेक्षित असून याकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबई शहराच्या क्रीडा विकासासाठी घणसोली भूखंड क्र. 1, से. 13 येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई शहराच्या हद्दींमध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणी शहराच्या लौकिकाला साजेशी आकर्षक रचनेची प्रवेशव्दारे. त्याचप्रमाणे येथील 29 मूळ गावांची ओळख अधोरेखित होण्यासाठी गावांठिकाणी प्रवेशव्दारे उभारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.
नवी मुंबईकरांच्या मालमत्ता, पाणीपट्टी करात वाढ नाही