जेएनपीटी (वार्ताहर) - रो रो सेवेसाठी बनविण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामामध्ये तांत्रिक चुका असल्याने १५० कोटीचे करंजा मच्छिमार बंदर बिनकामाचे ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रो रो सेवेचा रस्ता बनवताना गावातील येणारे गटाराचे पाणी करंजा मच्छिमार बंदराच्या चॅनलमध्ये जाणार असल्यामुळे मच्छि दुषित होण्याचा धोका असल्याची तक्रार करंजा मच्छिमार सोसायटीने आणि गावातील मच्छिमार बांधवानी केली आहे. भविष्यातील धोका ओळखून गावातून येणारे गटार थेट समुद्राच्या मध्यात सोडावे अशी मागणी करंजा सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र मत्स्यव्यवसाय उद्योग, मेरीटाईम बोर्ड आणि संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत. करंजा रेवस रो रो सेवेसाठी करंजा येथे जेट्टीचे आणि इतर कामे पुर्ण झाली आहेत. यासाठी सुमारे १० कोटी रक्कम खर्च करण्यात आली आहे. यामध्ये ब्रेक वॉटर बंधारा व जेट्टी तसेच येथे सर्व बोटींना पाणी, पेट्रोल-डिझेल भरण्याची सोय, स्वच्छतागृहे, प्रवाशांसाठी अत्याधुनिक निवारा शेड ही कामे पुर्ण झाली आहेत. आता रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र हा रस्ता बनविताना ठेकेदाराने कोणत्याही तांत्रीक बाबी न पहाता रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात करंजाच्या नवापाडा येथे पुराचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. तसेच गावातील येणारे गटाराचे पाणी बंदरात थांबलेल्या मच्छिमार नौका आपल्या बोटीतील मच्छि धुवण्यासाठी समुद्रातील पाण्याचाच वापर करतात. मात्र चॅनलमधल्या दुषित पाण्याने मच्छि धुतल्यास ती दुषित होण्याचा धोका असल्याचे मत करंजा सोसायटीचे चेअरमन करंजा नाखवा यांनी व्यक्त केला आहे. एकदा मच्छि दुषित असल्याचे परदेशात आढळून आले तर आपल्या मासळीला बंदी घातली जाईल त्यामुळे मच्छिमारांचे आणि शासनाचे मोठे नुकसान होणार असल्याचे मत करंजा मच्छिमार सहकारी सोसायटी चे चेअरमन भालचंद्र कोळी यांनी व्यक्त केले. भविष्यातील धोका ओळखून गावातील येणारे गटाराचे पाणी हे रो-रो सेवेच्या शेवटच्या टोकापर्यंत नेवून सोडल्यास बंदराच्या चॅनलमधील पाण्यावर त्याचा दुष्परिणाम होणार नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले.
रो-रोसेवेच्या तांत्रिक चुकांमुळे करंजा मच्छिमार बंदर ठरणार बिनकामाचे?