राज्यस्तरीय अधिवेशनामुळे भाजपला उर्जा?


नवी मुंबई (प्रतिनिधी)- येत्या एप्रिल मध्ये होणार्‍या नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षातर्फे शिरवणे औद्योगिक भागात दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन भरवून राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण करतांनाच नवी मुंबईतील भाजपलाही उर्जा देण्याचे काम केले आहे. आगामी काळात नवी मुुंबई आणि औरंगाबाद या दोन्ही महापालिकांमध्ये निवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप विरोधात महाआघाडी लढणार आहे. शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीचा प्रयोग राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी केल्यानंतर आता हाच प्रयोग जिल्हा परिषद निवडणूकानंतर महापालिकांसाठी करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राजकीय ताकद देण्यासाठी भाजपचे प्रदेश अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल असा विश्‍वास नेतृत्वाने व्यक्त केला आहे. 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  रेल्वेमंत्री पियुष गोयल, रावसाहेब दानवे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, उदयनराजे भोसले, मंदा म्हात्रे आदी मान्यवर या अधिवेशनाला उपस्थित होते. या अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईच्या विकासाची प्रशंसा करतांना गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्याचा विश्‍वास व्यक्त केला. या अधिवेशनामध्ये आ. गणेश नाईक व आ.मंदा म्हात्रे यांनी स्वागतपर भाषणे करतांना नवी मुंबई महापालिकेवर पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असा निर्धार जाहीर केला. या अधिवेशनासाठी आलेल्या केंद्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या महाआघाडीतील घरोब्याला अधर्मी व नितिमत्तेविरोधात केलेली युती अशी संभावणा करत महाआघाडीमुळे भाजपला यापुढे स्वबळावर लढण्याची उत्तम संधी लाभल्याचे सांगितले. 
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले, देशातील बहूसंख्य राजकीय पक्षात घराणेशाही असून त्याच्या घराण्यातील वारसदार पुढे पक्षाचे प्रमुख होतात. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता देखील पक्षाचा प्रमुख होतो असा भाजप एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय जनता पक्ष हा विचारांवर आणि संघटनेवर चालणारा पक्ष आहे.  अनेक पक्षांनी त्यांच्या मुळ विचारधारा सोडल्या. मात्र भाजपाने कधीही आपल्या तत्वांना अंतर दिले नाही असे स्पष्ट करत 17 कोटी सदस्य संख्या असलेला भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. ‘कल हमारा था.. आज भी हमारा है ...आनेवाला कल भी हमारा रहेगा’ अशी घोषणा करुन जे पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांमध्ये विश्‍वासाची पेरणी केली. 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनात महाआघाडी सरकारवर टिकास्त्र सोडले. हिंमत असेल तर आमचं सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान देणार्‍या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना प्रतिआव्हान देतांना ते म्हणाले , सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणूका घ्या. तुम्ही तिघे एकत्र आहात ना?  जनता आजही कुणाच्या बाजुने आहे ते तुम्हाला कळेल असेही ते म्हणाले. आज राज्यात महिलांवर अन्याय वाढले असतांना सरकार गप्प असून येत्या 22 तारखेला राज्यभर तहसिल कार्यालयात आंदोलन करुन सरकारला जाब विचारण्यात येईल असा इशारा दिला. आपल्या विजयाची सुरुवात नवी मुंबईपासून होईल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले की, आम्ही नैतिकता पाळून शिवसेनेबरोबर निवडणूक लढवली. मात्र शिवसेनेने विश्‍वास घात करुन सत्तेसाठी अभद्र युती केली अशी घणाघाती टिका शिवसेनेवर केली. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसतांना माझ्यासारख्या सामान्य कुटूंबातील व्यक्ती देखील या गौरवशाली पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी दोनदा निवडून येऊ शकतो हे केवळ भाजपामध्ये शक्य आहे असेही ते म्हणाले. 
आ.गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टी हा पक्ष राष्ट्रभक्ती आणि माणूसकी धर्माचे पालन करणारा पक्ष असल्याचे नमूद केले. नवी मुंबईत महाराष्ट्रासह देशातल्या सर्व प्रांतांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात असे सांगून सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्ती देखील आपल्या कर्तबगारीवर भाजपामध्येच सर्वोच्च पदापर्यत पोहोचू शकते असे ते म्हणाले.