नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापौर चषक ४० प्लस क्रिकेट स्पर्धेत सारसोळे संघ ग्रामीण क्षेत्रातून तर नेरुळ फ्रेन्डस् संघ शहर क्षेत्रातून विजेता ठरला. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सेक्टर १५, घणसोली येथील फोर्टी प्लस मैदानात ३ दिवस खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील ३२ व शहरी भागातील १९ संघांनी सहभाग घेतला. सारसोळे गांव ४० प्लस संघाने करावे ४० प्लस संघावर ७ गडी राखून विजय मिळवित ग्रामीण क्षेत्र महापौर चषकाचा मान मिळवला. तसेच नेरुळ फ्रेन्डस् ४० प्लस संघाने युनायटेड स्पोर्टस ४० प्लस संघ ऐरोली यांच्यावर ८ विकेट्सने विजय संपादन करीत शहरी क्षेत्र महापौर चषक पटकाविला. ग्रामीण भागात दिवागांव आणि दारावे ४० प्लस संघ त्याचप्रमाणे शहरी क्षेत्रात खारीगांव व सत्यमेव ऐरोली हे ४० प्लस संघ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. 'नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस स्पर्धेतील विजेते संघ व खेळाडूंना गौरविण्यात आले. सदर पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी महापौर जयवंत सुतार, माजी खा.डॉ. संजीव नाईक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक सुनिल पाटील व घनश्याम मढवी, नवी मुंबई फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, सचिव लिलाधर पाटीलखजिनदार नरेश गौरी, कार्यकारणी सदस्य विकास मोकल, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अभिलाषा म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ४० प्लस क्रिकेटमुळे खेळाचा सराव होतोशारीरिक तंदुरुस्ती राखली जाते व अंगभूत क्षमतेचा विकास होतो असे सांगत माजी खा.संजीव नाईक यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर नवी मुंबई महापालिकेने नेहमीच गुणवंतांना उत्तेजन देण्याची भूमिका जपली असून ४० प्लस क्रिकेटच्या माध्यमातून खेळासोबतच आरोग्य रक्षणाचा संदेश प्रसारित करणाऱ्या क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले. तीन दिवस अत्यंत उत्साहात नवी मुंबई महापौर चषकांतर्गत ४० प्लस क्रिकेट स्पर्धा ५१ संघांच्या सहभागाने यशस्वी झाल्या त्याबद्दल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी सहभागी संघांचे उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार ग्रामीण क्षेत्रातून सारसोळे ४० प्लस संघाचे दत्ता मेहेर आणि शहरी क्षेत्रात नेरुळ फ्रेन्डस् ४० प्लस संघाचे जीतू परदेशी यांना प्रदान करण्यात आला. दारावे संघाचे संजीव पाटील हे ग्रामीण क्षेत्रातील व खारीगांव संघाचे जयेश सावंत शहरी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेकरावे संघातील उदय तांडेल यांनी ग्रामीण भागात व युनायटेड स्पोर्टस संघातील पुंडलीक हरीयन यांनी शहरी भागात सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पटकाविला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून दिवा संघातील प्रकाश केणी आणि सत्यमेव ऐरोली संघातील आनंद बिस्ट यांना गौरविण्यात आले.
सारसोळे संघ व नेरुळ फ्रेन्डस् संघ नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस स्पर्धेचे मानकरी