तुर्भ्यात अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग सुरूच


तूर्भे (प्रतिनिधी)- तुर्भे नाका ते इंदिरानगर आणि तुर्भे औद्योगिक क्षेत्रातील निवारा लॉज ते हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडे जाणार्‍या रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदा अवजड वाहने उभी करण्याचे प्रकार सुरु आहेत. या वाहनांमुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच या मार्गावर अनेकवेळा अपघाती घटना होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे ही अवजड वाहने तेथून हटवण्यात यावीत या मागणीसाठी यापूर्वी
 गत महिन्यातील 5  आणि 6 तारखेला शिवसेनेतर्फे उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी वाहतूक विभाग व नवी मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सदर ठिकाणच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, रात गई बात गई या उक्तीप्रमाणे पुन्हा सदरठिकाणी परिस्थिती जैसे थे स्वरूपाची असल्याने शिवसेनेने पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ ,महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आदींना निवेदन धाडत सदरठिकाणावरील अवजड वाहने तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
 दरम्यान, या समस्येबाबत  यापूर्वी केलेल्या उपोषणानंतर अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे कारवाई झाली नसल्याने या प्रकारातून आपली घोर निराशा होत असून  वाहतूक विभाग व नवी मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यानी आपला विश्‍वासघात केला असल्याच्या भावना उपशहर प्रमुख प्रदीप वाघमारे यांनी व्यक्त केल्या आहेत. उपोषणाच्या दरम्यान  तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन गायकवाड, तुर्भे एम.आय.डी. सी.पोलीस स्टेशनचे पोलीस निरी.सचिन राणे आणि तुर्भे विभाग कार्यालयाचे सहा.उपायुक्त समीर जाधव यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे आणि उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांना शब्द दिला होता की काही तांत्रिक अडचणी दूर करून पुढील पंधरा दिवसात सर्व अवजड वाहने त्या ठिकाणाहून हलविण्यात येतील व रहदारीसाठी पूर्ण रोड कायमस्वरूपी मोकळा करून देण्यात येईल.परंतु जवळपास दीड महिना उलटून गेला तरी एकाही वाहनावर कारवाई करण्यात आली नाही किंवा एकही वाहन तेथून हटविण्यात आले नाही. त्यामुळं परिस्थिती जैसे थे स्वरूपाची असल्याने निदान आता तरी गोरगरीब जनतेच्या जीवाशी  निगडित असणारी ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अन्यथा पुन्हा एकदा जनतेसाठी प्राणांतीक उपोषण करावे लागेल असा इशारा प्रदीप बी.वाघमारे यांनी दिला आहे.