घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ अध्यक्षांचे प्रतिपादन
तुर्भे (प्रतिनिधी) - भाजीपाला व्यापारातील अडचणी अनेक आहेत. व्यापार कमी होतोय. व्यापारी लोक गाळे विकत आहेत. व्यापाऱ्यांना आपला व्यापार बंद पडायची चिंता सतावत आहे. अशावेळी व्यापार कसा वाढेल, व्यापाऱ्यांना सुखाने जगता येईल, त्यांचे प्रश्न कसे सुटतील याचा विचार करणारा आणि अहोरात्र आपल्यात राहणारा लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांना हवा आहे. शंकरशेठ पिंगळे हे व्यक्तीमत्व रात्री एक वाजताही व्यापाऱ्यांसाठी धावून येणारे असून सर्वच व्यापारी शंकरशेठ पिंगळे यांचे कार्य जाणून आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने पाठिशी राहायला हवयं, असे आवाहन घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलासशेठ ताजणे यांनी काल प्रचाराच्या समारोप सभेत केले. यावेळी भाजीपाला महासंघाचे अध्यक्ष कैलासशेठ ताजणे पुढे म्हणाले की, आजची सभा ही प्रचारसभा नसून एक प्रकारे विजयाचीच सभा आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मागायला, पाठपुरावा करायला शंकरशेठ पिंगळे सतत प्रयत्नशील असतात. बाजार समिती आवारात सर्व सुविधा मिळायला हव्यात, सुरक्षा व्यवस्थेत अजून सुधारणा व्हायला हवी. हे सर्व प्रश्न समस्या फक्त तळमळ असणारी आणि सर्व गोष्टींचा अभ्यास बाळगणारी व्यक्तीच सोडवू शकते असे स्पष्ट करत कैलासशेठ ताजणे यांनी उद्योग, व्यवसाय, शेती, अध्यात्म, राजकारण समाजकारणात व्यस्त असणारे शंकरशेठ पिंगळे खऱ्या अर्थाने कार्यसम्राट असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी प्रशांत जगताप, उस्मानभाई सय्यद, बाळासाहेब जाधव, सुरेशशेठ गुप्ता, नगरसेवक प्रकाश मोरे, रामदास पवळे, बाळासाहेब हिवरकर विविध मार्केट विंगचे अध्यक्ष, व्यापारी संघटना संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शंकरशेठ पिंगळे म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मनापासून इच्छा होती. मात्र तसे होऊ शकले नाही. अनधिकृत व्यापाराला चालना देणारे, गाड्या सोडायला सांगणारेच आज अपप्रचार करत आहेत. ज्या झाडाला गोड फळे येतात त्यालाच दगड बसतात म्हणून आपण कुणाचे नाव घेत नाही आणि उत्तर देत नाही असे सांगत शंकरशेठ पिंगळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी जना भाजी बाजार व्यापारी असोसिएशनचे खजिनदार प्रदीप बनसोडे, सदस्य विशाल मोकल, महात्मा फुले को-ऑप.हौसिंग सोसासटीचे संचालक आनंद खेडकर, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे सचिव प्रशांत जगताप. क्रांतीसिंह नाना पाटील भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे सचिव बाळासाहेब साळखे. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष उस्मानभाई सय्यद, धर्मवीर संभाजी राजे उत्सव मंडळाचे अध्यक्ष सर्यकांत डोंडे बंकेश गप्पा. शशिकांत पिंगळे, अर्जुन दवेकर, दादा झेंडे, सोपारन मेहर, खजिनदार गणेश पावगे आदींची सभेत भाषणे झाली.