सीबीडीत पोलिसांनी रोखला युथ मार्च


नवी मुंबई (प्रतिनिधी)- एनआरसी व नागरीकत्व कायदा(सीएए) विरोधात डेमाँक्राँटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया (मार्क्सवादी) यांच्यावतीने न्हावाशेवा पोलीस ठाणे उरण ते चैत्यभूमी मुंबई असा काढण्यात आलेला युथ मार्च काल  बी टी रणदिवे हॉल, आग्रोळी गाव बेलापूर येथून मुंबईच्या दिशेने सायंकाळी जात असताना नवी मुंबई पोलिसांकडून हा युथ मार्च  रोखून धरला आणि या युथ मार्चमध्ये सहभागी झालेल्या अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत नवी मुंबई मधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
देशाला आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याच्या नावावर देशाची संपती जवळपास फुकट वाटण्याचे किळसवाणे काम देशात सुरू आहे. एलआयसी, ओएनजीसी, एयर इंडिया, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन सारख्या उद्योगाचे खाजगीकरण करण्याचे धोरण सूरू आहे. युवकांना शिक्षण आणि नोकर्‍या नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत. या आवश्यक गरजांवर उपाय योजना करण्याचे सोडून केंद्र सरकार सीएए, एनआरसी, एनपीआर सारखे विषय घेवून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप यावेळी मोर्चेकर्‍यांतर्फे करण्यात आला. या मार्चची सुरवात दि 16 पासून झाली. 
यात  जेएनपीटी टाऊनशिप, उरण येथे डी वाय एफ आय कार्यकर्ते जमा होऊनसरकार विरोधी घोषणा  देण्यात आल्या होत्या. त्यावेळी आंदोलनातील कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्हावा शेवा पोलीस ठाणे येथे तर काही कार्यकर्ते यांना जासाई पोलीस चौकी येथे आणले होते. दि. 17 रोजीच्या सदर पायी मोर्चा करिता स्थानिक पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असताना नवी मुंबई .पोलीस आयुक्त यांच्या जमावबंदी आदेशाचे भंग केल्यावरून उरण पोलीस ठाण्यात अनेकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  काल दि. 18 रोजी माजी खा. प्रिती शेखर (महासचिव,डी वाय एफ आय)यांच्या नेतृत्वाखाली बी टी रणदिवे हॉल,आग्रोळी गाव,सी बी डी बेलापूर येथून मुंबईच्या दिशेने हा मार्च सुरू झाला असता पोलिसांकडून त्याला अडविण्यात आले होते. व सहभागी आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेऊन नवी मुंबई मधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले होते. याबाबत यातील आंदोलनकर्ते यांच्यावर सीबीडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर 30/ 2020 / भादवि कलम 143,145 ,149 ,188,सह महाराष्ट्र पोलीस  कायदा 37 (1)135 अन्वये गुन्हा दाखल  करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली