प्रशासनाची जबाबदारी वाढलीय

नवी मुंबई अनेक बाबतीत आघाडीवर आहे. त्या तुलनेत पनवेल, उरण परिसर विकासाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे या वाढत्या शहरांमध्ये आणि परिसरातही वाहतूक व्यवस्था सुधारणे अत्यंत गरजेचे असून त्यादृष्टीने रस्त्यांची कामे सुरु आहेत. नजिकच्या काळात ती पूर्णत्वास जातील वा आणखीही कामे होत राहतील, अशा काळात वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होतच असतो. पावसाळ्यात ही स्थिती अत्यंत बिकट बनते, बऱ्याचदा होणान्या वाहतुक कोंडीमुळे लोकांना प्रवास करणे नको वाटते. आताही पनवेल-उरण या मुख्य आणि बायपास मार्गावर अनेक ठिकाणी कंटेनर्स उभे असतात, तीच गत पनवेल-पेण मार्गावर दिसून येते. पनवेल-कोकण मार्ग रुंदीकरणाचे काम सुरु आहे, त्यामुळे वाहने चालविणे जोखमीचे बनून गेले आहे, अपघातांची शक्यता वाढली आहे. नवी मुंबईतून जाणाऱ्या पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण, काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी वाढते रस्ते अपघात आणि त्यात जखमी होणाऱ्यांची व मृतांची संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. नवी मुंबई आणि नजिकच्या उरण, पनवेल भागातही असे वाढते अपघात हा प्रश्न गंभीरच आहे. वास्तविक मुंबईला पर्यायी शहर म्हणून राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराची निर्मिती करीत गृहप्रकल्पही राबविले. वीज, पाणी, रस्ते, परिवहन, आरोग्य अशा विविध सुविधा पुरविल्या व पुढे हे शहर जनतेच्या पसंतीस उतरले. मूळ गावठाणे आणि नागरी भाग असे चित्र सुरुवातीच्या काळात नवी मुंबईत दिसून आले तरी आता मधल्या काळात गावठाण भागांचा झालेला विकास आणि तेथेही सर्वसुविधा असणे, स्वच्छतेसह इतर बाबीही लक्ष वेधून घेत आहेत. आताच्या घडीला नवी मुंबई शहराकडे २१व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून पाहिले जाते. नजिकच्या पनवेल शहरात पूर्वी नगरपालिकेमार्फत कारभार चालायचा. दरम्यान, महापालिकेची स्थापना होत सार्वत्रिक निवडणुक झाली, या महापालिका क्षेत्रात रायगड जिल्हा परिषदेत समाविष्ट असलेली पनवेल तालुक्यातील काही गावेही सामावून घेण्यात आली. आता महापालिका तेथील कारभार पहात आहे. नवी मुंबईतही सिडको आपल्या अधिकार क्षेत्रात कारभार पहात होती, दरम्यान सिडकोकडील जबाबदारी महापालिकेकडे आली त्याप्रमाणेच पनवेलमधीलही सिडकोने विकसित केलेल्या भागातील पाणी पुरवठा, स्वच्छता आदी व्यवस्था पाहण्याची जबाबदारी पनवेल महापालिकेला पार पाडावी लागते आहे. नवी मुंबई आणि पनवेल ही शहरे अगदीच नजिक आहेत; दोन्ही शहरांमध्ये सिडकोने विकसित केलेला भाग आहे आणि नवी मुंबईनंतर पनवेलही विकसित होत आहे, विकासाची अनेक मोठी कामे या ठिकाणीही सुरु आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी याच पनवेल तालुक्यातील गावांमधील जमिनी संपादित केल्या गेल्या आहेत. या दोन्ही शहरांनाही लगत असलेल्या उरण तालुका भागातही विकासाची मोठी कामे सुरु असून जेएनपीटीसह असणाऱ्या चार प्रमुख बंदरांमुळे अनेक कंटेनर यार्डस् व अनुषंगिक कंपन्या तालुक्यात आहेत. त्यास अनुसरुन लाखो लोक नोकरी, व्यवसाय करीत आहेत. आता ही तिन्ही शहरे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे वाढती वाहतुक आणि अपघात तसेच दूरगामी विचार करता या शहरांमध्येही अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचा मनसोक्त वावर, वाहतुक कोंडी, अस्वच्छता त्याचबरोबर गुन्हेगारीचा प्रश्नही आहेच; त्यामुळे असे असलेले आणि काही संभाव्य प्रश्नांची दाट शक्यता लक्षात घेत महापालिका व स्थानिक प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. त्यांना सजग राहत कारवाईसाठी ठोस पावले उचलावीच लागतील; तरच स्थिती आटोक्यात येऊ शकते, अन्यथा प्रश्न आणि धोके वाढतच राहतील!