सानपाड्यातील अनधिकृत झोपड्या हटविण्याची मागणी


नवी मुंबई (प्रतिनिधी) - येथील सानपाडा सेक्टर-१५,१६ए, १७, १८, १९, २० या ठिकाणी असलेल्या अनधिकृत झोपड्या हटविण्यात याव्यात अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून येथील स्थानिक नगरसेवकांकडून केली जात आहे. मात्र दरम्यानच्या काळात महापालिका स्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाल सुरु झाली नसल्याने काल पुन्हा याबाबतचे निवेदन महापालिकेचे महापौर जयवंत सुतार, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ तसेच महापलिका उपायुक्त, अतिक्रमण विभाग व विभाग अधिकारी, सानपाडा व तुर्भे विभाग पोलिस ठाण्यांना दिले असून सदरच्या अनधिकृत झोपड्या हटविण्याची मागणी केली असल्याची माहिती नगरसेविका वैजयंती भगत व रुपाली भगत यांनी दिली. यावेळी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरत भगत उपस्थित होते. सानपाडा येथील अनधिकृत झोपड्या हटविण्यात याव्यात यासाठी दि. २०.९.२०१७, २०.११.२०१७, १३.३.२०१९ व १९.११.२०१९ रोजी नवी मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता. मात्र दरम्यानच्या काळात महापालिका स्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाल सुरु झालेली दिसत नसल्याने काल (दि.२४स्मरण पत्ररुपात निवेदन देण्यात आले आहे, असे सानपाडा विभागातील नगरसेविका वैजयंती भगत व रुपाली भगत यांनी सांगितले. सदरच्या अनधिकृत झोपड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहतात. तसेच सदर ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात सुशिक्षित नागरी वसाहत आहे. झोपड्यांमधील नागरिकांमुळे निर्माण होणारी विविध अस्वच्छता व अशांतता या त्रासाने तेथील नागरीक व्यथित झाले असून या अनाधिकृतझोपड्यांमध्ये गैरप्रकार चालत असल्याचे निदर्शनास आले आहे. नशा करणाऱ्या काही समाजकंटकांचा या परिसरात जास्त वावर असून ह्या झोपडपट्टीतून गांजा यासारख्या नशेली पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच परिसरात अस्वच्छता, अशांतता व होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सदर अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई करावी येथील शहरी नागरिकांना दिलासा द्यावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या असल्याची महिती नगरसेविका वैजयंती भगत व रुपाली भगत यांनी दिली.