महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचे निर्देश... संस्थेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांची पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी करा!


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या महापे येथील शाळेतील काही विद्यार्थीनींशी संगणक प्रशिक्षक लोचन परुळेकर याने गैरवर्तणूक केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. तथापी या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे काटेकोरपणे लक्ष देण्याचे तसेच यापुढील काळात सी.एस.आर. फंडातून सुविधा पुरविताना त्यामध्ये सदर संस्थेमार्फत नेमणूक करण्यात येणा-या कर्मचा-यांचीही पोलीस विभागामार्फ त चारित्र्य पडताळणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. तर संबंधीत प्रशिक्षक महापालिकेचा कर्मचारी नसून त्याचा नवी मुंबई महापालिके च्या आस्थापनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या महापे येथील शाळेतील काही विद्यार्थीनींशी संगणक प्रशिक्षक लोचन परुळेकर याने गैरवर्तणुक के ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधीत संगणक प्रशिक्षक विद्यार्थीनींशी गैरवर्तणूक करीत असल्याचे त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महापालिका शिक्षण विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्यास अनुसरून ज्या संस्थेमार्फत या प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती त्या संस्थेस संबंधित संगणक प्रशिक्षकास त्वरीत बडतर्फ करण्यात येऊन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करणेबाबत पत्राने लेखी कळविण्यात आले होते. त्यास अनुसरून तुर्भे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ___ गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत नवी मुंबई महापालिका ५५ प्राथमिक आणि १९ माध्यमिक शाळांच्या माध्यमातून साधारणत: ४० हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरवित असून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सर्वांगीण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आवश्यक काळजी घेण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून निविदेचे काम अंतिम टप्यात आहे. याशिवाय मुलांमध्ये वाढत्या वयात जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग यांची 'तारुण्यभान' या विषयावर मार्गदर्शन सत्रे आयोजन करण्यात आली होती. त्याचप्रमाणे महापालिका शाळेतील विद्यार्थिनींसाठी 'अभया' या नाटकाचा विशेष प्रयोगही आयोजित करण्यात आला होता. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महापालिका शिक्षण विभाग विविध उपक्रमांचे आयोजन करीत असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.