नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सेक्टर १० ए वाशी येथील जुहू चौपाटी अर्थात मिनी सी शोअर भागात केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम असे नामकरण । महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, स्थानिक नगरसेवक अविनाश लाड, नगरसेविका अनिता मानवतकर, उद्यान विभागाचे उप आयुक्त नितीन काळे, माजी नगरसेविका प्रणाली लाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबईतील अतिशय लोकप्रिय असणा-या मिनी सी शोअर भागाचे सौंदर्य वाढविणाऱ्या केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या उपवन स्वरुपातील उद्यानास भारताचे माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान असे नामकरण करून एक चांगला आदर्श लोकांच्या नजरेसमोर राहील असे प्रतिपादन महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी _केले. तर स्थानिक नगरसेवक अविनाश लाड म्हणले की, अत्यंत पडीक स्वरुपात असलेल्या या जागेचा कायापालट झाला असून याठिकाणी पक्षांना आकर्षित करणारे वृक्ष लावल्याने विविध प्रकारचे पक्षी येथे येत आहेत. त्यांच्या करिता पाण्याचीही व्यवस्था उद्यान विभागामार्फत लवकरच केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारच्या अमृत योजनेमध्ये हरित क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत हे उद्यान विकसित करण्यात आले असून यामध्ये फळे येणारी देशी झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात विविध प्रकारच्या पक्षांचा वावर वाढला असून नवी मुंबई महापालिका क्षेत्राची जैव विविधता वृध्दींगत होण्यामध्ये लक्षणीय भर पडली आहे.
वाशी येथील उद्यानास माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांचे नाव