नवी मुंबई (प्रतिनिधी) - गेल्या तीन वर्षांपासून सानपाडा से१५,१६ए,१७,१८,१९,२० या ठिकाणी असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करीत या झोपड्या हटविल्या. काल ही धडक कारवाई करण्यात आली. सदर अनधिकृत झोपड्यांमधून आश्रय घेणारे नागरीक वाईट कार्य करु लागल्याचे दिसून येत होते. तसेच त्यांच्यामुळे स्थानिक नागरीकांनाही त्रास होत असेयाबाबतची दखल घेत स्थानिक नगरसेविका रुपाली भगत यांनी नवी मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार सुरु ठेवला होता. गेली तीन वर्षे याबाबत महापालिका व संबंधीत प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत कारवाईबाबत पाठपुरावा केला होता. मासिक महासभेतही यासंबंधी हरकतीचा मुद्दा नगरसेविका रुपाली भगत यांनी उपस्थित करून सदर ठिकाणचे नागरिक हे बंगलादेशी असल्याचे सूचित केले व अनाधिकृतपणे झोपड्या निर्माण करुन ते राहत आहेत. सदर परिसरात घाण करुन रस्त्यावर शौच करतात, तसेच गांजा सेवन करुन रात्री एकमेकांशी भांडणे करीत असून आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. तसेच मंगळवारी (दि.२५ फेब्रुवारी) पुन्हा याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त अण्णसाहेब मिसाळ व महापौर जयवंत सुतार यांना देण्यात आले होते. याची दखल घेत काल महापालिका प्रशासनाने कारवाई करीत सानपडातील अनधिकृत झोपड्या तोडण्यात आल्या. सदर कारवाईच्या वेळेस र जेसीबी, ४ ट्रक पोलिस दल व तुर्भे विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सहाय्याने सदर अनाधिकृत झोपड्यांवर तोड़क कारवाई करण्यात आली.
सानपाड्यातील अनाधिकृत झोपड्यांवर अखेर महापालिकेची तोडक कारवाई