पनवेल (प्रतिनिधी) - पुणेमुंबई द्रुतगती महामार्गावर सर्वाधिक अपघात घडणा-या भागातील अपघातग्रस्तांची वैद्यकीय उपचारांसाठी परवड होत आहे. बोरघाट ते खालापूर या रस्त्यावर अधिक अपघात होत असून, येथे ट्रमा केअर सेंटरची सुविधा नसल्याने अपघातातील जखमींना उपचारांसाठी पनवेल येथे जावे लागत आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास द्रतगती महामार्गाची विभागणी घाट मोर्चा क्षेत्र, घाटाखालील भाग (मुंबईकडील) आणि घाटावरील भाग (पुण्याकडील) अशी तीन भागात होतेयामध्ये सर्वाधिक अपघात हे घाट क्षेत्रात आणि घाटाखालील भागात झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षभराची तुलना करता सर्वाधिक अपघात हे रायगड, नवी मुंबईत झाले आहेत. यावरून घाटाखालील भागात जास्त अपघात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी पनवेलला हलवावे लागत असल्याने वेळ वाया जात आहे. द्रतगती महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. उभारणीनंतर जवळपास तीन ते चार वर्षांनी कार्यान्वित झाले. मात्र, आता घाट क्षेत्र आणि मुंबईकडील भागात अधिक अपघात होत असल्याने तेथेही खालापूरजवळ ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे.
अपघातग्रस्तांना पनवेल, नवी मुंबईचा आधार.. द्रुतगती महामार्गावर ट्रामा केअर सेंटर सुविधेची गरज