नवी मुंबईत बालभवन उभारण्यात यावा!

आ. मंदा म्हात्रे यांची सिडकोकडे मागणी



नवी मुंबई (प्रतिनिधी) - बेलापूर विधानसभा क्षेत्रात अनेक बालकलाकार निर्माण होत असून तबलावादक, गायन, हार्मोनियम, बासुरी, वीणा आणि संगीतातल्या इतर दुर्मिळ वाद्यांच्या माध्यमातून या बालकलाकारांनी आपली ओळख निर्माण केली आहे. बालकलाकारांच्या अशा कलागुणांना वाव मिळावा व त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी नवी मुंबई महापालिकेला हक्काचे सांगीतिक व्यासपीठ हवे. __यासाठी सिडकोने भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. मंदा म्हात्रे यांनी सिडकोकडे केली आहे. याबाबत त्यांनी काल सिडको भवन येथे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना निवेदन दिले आहे. बालभवनाच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकार नवी मुंबईला मिळतील. नवी मुंबईत सिडकोच्या राखीव असलेल्या भूखंडांवर झोपडपट्टी वसू नये आणि साहजिकच अतिक्रमणही होऊ नये याकरीता नवी मुंबईत असलेल्या भूखंडांपैकी एक भूखंड बालभवनसाठी देण्यात यावा, अशी _मागणी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोके श चंद्र यांना निवेदनाद्वारे आ. मंदा म्हात्रे केली आहे. यासंदर्भात सिडकोच्या संबंधित विभागाला बालभावनकरिता भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत तात्काळ आदेश दिले असल्याची माहिती आ. मंदा म्हात्रे यांनी दिली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ.राजेश पाटील, भाजपा महामंत्री विजय घाटे, ज्येष्ठ समाजसेवक महादेव पाटील, पांडुरंग दत्तात्रय कोळी, माजी नगरसेवक दि.ना.पाटील, दिलीप वैद्य, संदेश पाटील, प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ आणि सिडकोच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.