नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होत प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरु होण्यास आणखी काही वर्षांचा काळ लागेल, हे निश्चित. विमानतळ धावपट्टी होण्याच्या दृष्टीने आणि एकूणच कामांसाठी शासन व सिडकोकडून नेमण्यात आलेल्या कंपन्यांकडून कामे सुरु असल्याचेही दिसून येत आहे. डोंगर कटाईचे काम आव्हानात्मक असले तरी यंत्रणांकडून हे काम होत आहे. मात्र तरीही आधी अंदाजित केल्याप्रमाणे या वर्षीच्या म्हणजे २०२०च्या अखेरीस विमानोड्डाण अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र कामांचा उरक नजिकच्या काळात होणे अशक्य असल्याचे दिसून येते. अन्यथा शासन पातळीवर याबाबतची वाच्यता केली गेली असती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत अनेक अडचणी निर्माण झाल्या; भूसंपादनापासून जी गावे विस्थापित होणार आहेत, त्या गावांमधील रहिवासीही घर सोडून जाण्यास सहज तयार होत नव्हते, शिवाय अन्य मागण्या आणि प्रश्न यामुळे नागरीकांच्या विस्थापनाचा प्रश्नही निर्माण झाला होता. आताच्या घडीला बरेच प्रश्न मार्गी लागले आहेत आणि प्रकल्पग्रस्त व स्थानिकांचे जे काही प्रश्न आहेत, ते सोडविले जावेत यासाठी आंदोलनेही होताहेत. अशा पार्श्वभूमीवर विमानतळाचे काम पूर्ण होत किमान सुरुवातीला मालवाहतूक तरी केव्हा सुरु होणार याचाही अंदाज आता घेणे कठीण असल्याचे दिसते. तथापी नव्या सरकारचे प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, पायाभूत सुविधांचा विकास एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून न पाहता त्या परिसरातील पर्यटन, उद्योग, शहरविकासाला चालना कशी मिळेल ही दूरदृष्टी ठेवली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. शिर्डी विमानतळ टर्मिनस इमारतीचे विस्तारीकरणाच्या कामाचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, शिर्डीची आध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तेथील शिर्डी विमानतळ टर्मिनस इमारतीचे विस्तारीकरण संकल्पनाधारित (थीम बेस्ड) पद्धतीने करण्यात यावे, असे निर्देश दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिर्डी विमानतळावर 'नाईट लँडींग'ची सुविधा एप्रिलपासून कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही निर्देश दिले. विधानभवनात ही बैठक झाली. या बैठकीस पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व अन्य अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळाबाबतचे नियोजन झाले असले तरी नव्याने त्यात काही चांगले करता येईल का, याचाही विचार सरकारच्या मनात असेल तर उत्तमच म्हणायचे. विमानतळांचा विकास करताना तेथील शहरांशी चांगली दळणवळण यंत्रणा (कनेक्टिव्हिटी), मार्गावरील उद्योग, शहर विकासासाठी नगरनियोजन तसेच परिसरातील पर्यटन विकास साध्य करण्यासाठी नगरविकास विभाग, सिडको, एमएडीसी, एमटीडीसी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांनी समन्वयाने काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्या. नवी मुंबई विमानतळाबाबतही दळणवळण यंत्रणेसह अन्य मुद्दे महत्वाचे असून त्यादृष्टीने कामे सुरु आहेत. नवी मुंबई लगतच्या पनवेल, उरण भागात जी सध्या विकासकामे सुरु आहेत, हे त्याचेच परिणाम आहेत. त्यातही आता नव्याने काही सुधारणा होत या परिसरातील पर्यटन, उद्योग, शहरविकासाला चालना मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. नवी मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ हे जगाचे लक्षवेधी ठिकाण असेल, त्यानिमित्ताने परिसराचा सर्वार्थाने विकास होण्याच्या दृष्टीने व विमानतळाचे महत्व वाढण्यासाठी पावले पडत असतील तर स्वागतच होईल!
विमानतळाचे महत्व वाढो!