राज्यसरकारविरोधातभाजपचा एल्गार!


नवी मुंबई भाजप कार्यकर्त्यांचे तुर्भे सर्कल तहसीलदार कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन


नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात नवी मुंबईतील भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काल तुर्भे येथील सर्कल तहसीलदार कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करीत आपला निषेध नोंदविला. राज्यातील शेतक-यांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार आदींबरोबरच सरकारने यापूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता केलेल्या फसवणुकीविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधले. या धरणे आंदोलनाद्वारे महाआघाडी सरकारला जाब विचारून तहसीलदार कार्यालयातील अधिका-यांना निवेदन देण्यात आले. महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली असून या सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना धाक राहिला नसल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले. राज्यात माता भगिनींना नाही आधार.... उध्दवा अजब तुझे सरकार, शेतकरी सोडले वाऱ्यावर महिलांवर वाढते अत्याचार, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा कधी करणार... माता भगिनी निराधार...शेतकरी बेहाल हे आहे धोकेबाज सरकार असे लक्षवेधी फलक हाती घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याने त्या विरोधात भाजपने काल राज्यभर तहसील कार्यालयांतर आंदोलन छेडले होते त्यानसार नवी भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काल हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप महामंत्री राजेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दरम्यान, ठाण्यातही आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनआंदोलन केले होते.