नवी मुंबई (प्रतिनिधी)- सीवूड्स सेक्टर - 48 मध्ये नवीन तयार केलेल्या रस्त्याची तीन महिन्यात तिसर्यांदा खोदाई करण्याचा प्रकार घडल्याने याबाबत नागरिकांकडून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून तयार झालेल्या या रस्त्याचे तीन महिन्यात तिसर्यांदा खोदकाम करण्यात आल्याने मनसेचे शहरसचिव सचिन कदम यांच्यावतीने शहर अभियंता सुरेंद्र पाटील आणि परिमंडळ 1 चे उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार यांना निवेदन पाठवून सदरचा प्रकार ज्या अधिकार्यांमुळे झाला आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
यापूर्वी सदर रस्त्याची पाणी समस्येसाठीदोन वेळा या रस्त्याची खोदाई झाली आहे. यात साईधाम, न्यू ओंकार,अष्टगंधा या सोसायटीमध्ये 8 जानेवारी, 2020 रोजी पाण्याचा पुरवठा कमी असल्याने रस्ते खोदून सोसायटीला पाणी पुरवणार्या जल वाहिन्या बदलण्यात आल्या. तर नवरत्न हॉटेल जवळ तसेच साईधाम सोसायटीसमोर असणार्या दुकानात 3 डिसेंबर 2019 रोजी पाण्याची समस्या निर्माण झाल्याने हा रस्ता खोदून रात्री जलवाहिनी बदलण्यात येत होती. त्यावेळी उपस्थित पालिका कर्मचार्यांना या बाबत मनसैनिकांनी विचारले असता, वाहिनी गंजल्यामुळे बदलण्यात येत असल्याचे सांगितले होते. दोन वेळा रस्ता खोदलेला असतानाच दि.14 फेब्रुवारी रोजी जिओ या खाजगी कंपनीच्या वाहिन्या भूमिगत करण्यासाठी तिसर्यांदा सदरचा रस्ता खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या बाबत सचिन कदम यांनी दिलेल्या निवेदनात विविध प्रश्न व समस्या उपस्थित करण्यात आल्या आहेत. उपायुक्त व शहर अभियंता यांच्या भेटीसाठी गेलेल्या मनसेच्या या शिष्टमंडळात शहरसचिव सचिन कदम यांच्यासह विभागअध्यक्ष अमोल आयवळे, उप विभागअध्यक्ष अप्पासाहेब जाधव, शाखाअध्यक्ष संतोष टेकावडे, आकाश गाडे, सचिन चव्हाण, राजू कांबळे यांचा समावेश होता.
सीवूडमध्ये नवीन रस्ता तीन महिन्यात तिसर्यांदा खोदला : अधिकार्यांवर कारवाईची मनसेची मागणी