पनवेल (प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँक कथित आर्थिक घोटाळा प्रकरणाचे पडसाद काल राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत गैरव्यवहार झाला असून या बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तात्काळ परत करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी कर्नाळा बँकेला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी लेखीउत्तरात दिली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून शेकापचे नेते, माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासोबत बँकेच्या संचालक मंडळांतील १४ सदस्यांसह एकूण ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेयाप्रकरणी आ.प्रशांत ठाकूरआम.महेश बालदी यांनी काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होतात्यावर राज्याचे सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तर दिले. सदर लेखी उत्तरात म्हटले की, रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात जिल्हा विशेष लेखापरिक्षक संस्था, अलिबाग रायगड यांनी दिनांक १९ डिसेंबर, २०१९ रोजी सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांना सादर केलेल्या अहवालात ५१२ कोटी ५४ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नमद केले असून, सदर गैरव्यवहारात कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट व कर्नाळा अॅकॅडमीचा देखील समावेश केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या दिनांक २२ एप्रिल २०१९ रोजीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार सदर बँकेचे विशेष लेखापरिक्षण करण्यात आले आहे. सदर लेखापरिक्षण अहवालानुसार एकूण ६३ कर्जप्रकरणांमध्ये ५१२.५४ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले असून त्यापैकी १७ कर्ज प्रकरणांमधील रक्कम कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट व कर्नाळा अॅकेडमी यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग झाल्याचे लेखापरिक्षण अहवालावरुन निदर्शनास येत आहे. या प्रकरणी हजारो ग्राहकांना व ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळत नसून वारंवार मागणी करुनही धनादेश किंवा आरटीजीएसव्दारे पैसे मिळाले नाहीत ही बाब खरी आहे. या बँकेच्या ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बँकेच्या ठेवीदारांना तात्काळ ठेवी देण्याबाबत सहकार आयुक्तांनी बँकेस आदेश दिले आहेत. अधिनियमातील कलम ८१ अन्वये आथिक गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी यांनी दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल पोलीस स्टेशन, पनवेल यांना फिर्याद दाखल करणेबाबत पत्र दिले असून त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. बँकेस झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यासाठी अधिनियमातील कलम ८८ अन्वये कार्यवाही करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड यांची दिनांक ०४ फेब्रुवारी २०२० रोजीच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आलेली आहे, असेही सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
काळा बैंक कथित आर्थिक घोटाळा प्रकरण.ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ परत करण्याचे आदेश