नवी मुंबई (प्रतिनिधी)- पोलिस खात्यात अधिकारी असलेल्या माझ्या आईचा मृत्यू पोलिसांनीच केला असून आजवर माझ्या आईचा मृतदेहच मिळत नसल्याने व त्यासाठी पैसे नसल्याचे गृहखाते सांगत असल्याने मुख्यमंत्री उध्दवसाहेब आपण माझ्या आईच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे आदेश द्यावे व मला आपली भेट घेण्याची इच्छा असल्याने भेट द्यावी. अशी भेट यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाही. आपण भेट द्याल अशी अपेक्षा व्यक्त करणारे विनंतीवजा पत्र सध्या पनवेल कोर्टात खुनाचा खटला सुरु असलेल्या मयत अश्विनी बिद्रे - गोरे यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
सिध्दी उर्फ सुची राजु या पाचवीतील विद्यार्थीनीने आपल्या आईच्या तपासासाठी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून मुख्यमंत्री यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पत्रातून सिध्दी हिने आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले आहे की, वयाच्या 6 व्या वर्षापासून माझ्या आईचा मृतदेह शोधण्यासाठी बाबांबरोबर खूप वेळा मुंबईला आली होते. मात्र पैशांअभावी मृतदेह शोधता आला नाही. दरवेळी आमच्या पदरी निराशाच आली आहे.
महिला पोलिस अधिकारी संगिता अल्फान्सो यांच्यामुळे माझ्या आईचे खूनी तुरुंगात बसले आहेत. माझ्या आईच्या मृतदेहाचा शोध लागावा यासाठी यापूर्वीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रं फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सकाळपासून उशीरापर्यंत त्यांच्या कार्यालयाबाहेर थांबले होते. मात्र ते कार्यालयात असतानाही त्यांनी आम्हाला भेटायला बोलविले नाही. आता बाबा म्हणतो, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटूया. म्हणून ते दिवस आठवतात आणि मनात भिती निर्माण होते.माझी आपणास भेटण्याची इच्छा आहे.. आपण पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना...आपण माझ्यासाठी वेळ द्याल ना.... आमच्यावर झालेला अन्याय सांगण्यासाठी मला बोलायचे आहे, ऐकाल ना....अशी भावना चिमुरडया सिध्दी हिने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त करत माझ्या आईच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही केली आहे.
‘माझ्या आईच्या मृतदेहाचा शोध घ्या!’