नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेचे अंदाजपत्रक नुकतेच जाहीर झाले असून त्यातील प्रत्यक्ष उत्पन्न, विविध अनुदान आणि महसूल पाहता व होणारा खर्च पाहता केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी या अर्थसंकल्पात आकडे फुगवले गेल्याचे व हे सर्व काही येथील सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्त्वाला खूश करण्यासाठीच किंवा त्यांच्या दबावापोटी करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ता आनंद सिंह (बंटी) यांनी केला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्यावतीने आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते आनंद सिंह यांनी प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रकात ही माहिती दिली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामे आणि योजना व प्रकल्प यांची मंदावलेली गती पाहता मध्यंतरी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची प्रत्यक्ष भेट घेवून आर्थिक तरतूदी विषयी काही माहिती जाणुन घेतली निवेदनाद्वारे सूचनावजा अपेक्षा देखील व्यक्त केल्या होत्या, मात्र मागील अर्थसंकल्पात मूळ प्रस्तावित रक्कम ३४५५.६३ कोटी रु.मध्ये स्थायी समितीद्वारे १७३ कोटी रु. व महासभेद्वारे १३९ कोटी रु. ची वाढ सुचवून एकूण अर्थसंकल्पीय रक्कम ४०२० कोटी रु.इतकी झाली होती. मात्र वास्तवात प्रत्यक्ष उत्पन्न, विविध अनुदान आणि महसूल पाहता व होणारा खर्च पाहता केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी या अर्थसंकल्पात आकडे फुगवले गेल्याचे आनंद सिंह यांनी म्हटले आहे. पार्किंगसाठीची व्यवस्था हा गंभीर विषय असतानाही त्यासाठी काहीही पावले उचलली गेली नाहीत, क्रिडा विषयक संकुले नाहित, महापालिका शाळात ई-लर्नीग कागदावरच आहे, विविध उड्डाणपूल-पादचारी पूलांची कामे मार्गी लागू शकले नाही असे कित्येक विषय मागील आर्थिक वर्षात पूर्ण करता येवू शकले नाहीत, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रवक्ते आनंद सिंह यांनी केला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या अंदाजपत्रकात मोठेपणाचा दिखावा -काँग्रेसची टीका