पनवेल भाजपच्यावतीने महाविकास आघाडीविरोधात धरणे आंदोलन


पनवेल (प्रतिनिधी) - सत्तेच्या लालसेपोटी शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सपशेल फोल ठरलेल्या व निद्रास्त असलेल्या महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात पनवेल भाजपाच्यावतीने काल आंदोलन केल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर यांनी दिली. भाजपच्यावतीने काल राज्यभर सत्तारुढ महाविकास आघाडीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून आ.प्रशात ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले व शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांकडे देण्यात आले. सातबारा कोरा करा, महिलांवरील अत्याचार रोखा, जनतेचे पैसे लाटणाऱ्या बँकेवर कारवाई करा, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. कर्नाळा बँकेकडून ठेवीदारांना पैसे मिळालेच पाहिजेत, तसेच शेतकरी कष्टकऱ्यांना दिलेले शब्द का पाळले जात नाहीत याची महाविकास आघाडी सरकारने जनतेला उत्तरे द्यावीत, अशीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल घरत, राजेंद्र पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने घोषणांची पूर्तता न करता शेतक-यांची घोर फसवणूक केली. त्याचबरोबर या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दिवसेंदिवस ढासळती कायदा सुव्यवस्था याकडे तसेच आर्थिक गैरव्यवहाराबाबत आघाडी सरकार फक्त बघ्याचीच भूमिका घेत आहे. आघाडी सरकारमध्ये निर्णयक्षमता नसल्याने ठोस उपाययोजना होत नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनता पुरती कंटाळली असल्याचा आरोप यावेळी भाजपच्यावतीने करण्यात आला.