नवी मुंबई (प्रतिनिधी) - महिलांचा सन्मान राखतांना स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या सभेची सुरुवात जमलेल्या माझ्या माता भगिनींनो... अशी करायचे, मात्र सध्या शिवसेना सभेच्या ऐवजी आदेश भावोजीच्या खेळ मांडियेला... या खेळालाच शिवसेनेच्या सभांचे स्वरुप देत शिवसेनेने नवी मुंबईत प्रचाराला सुरुवात केली आहे. या खेळाच्या माध्यमातून एकीकडे उपस्थित महिलांपैकी खेळात सहभागी भगिनींची यथेच्छ टिंगळटवाळी होत असतांना नुकत्याच पार पडलेल्या नेरुळ जुईनगर कार्यक्रमात शिवसेना नगरसेविकेवरच अवमानीत होण्याची वेळ आली. व्यासपीठावरच्या मान्यवरांमधून या नगरसेविकेला डावलण्यात आल्याने या नगरसेविकेने काढता पाय घेतला. या संदर्भातील हकीगत अशी की, बुधवारी (दि.२६) जुईनगर सेक्टर २६ येथे नेरुळ आणि जुईनगर अश्या दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आदेश बांदेकर यांच्या 'खेळ मांडीयेला' या कार्यक्रमाचे आयोजन विशेषतः महिला वर्गासाठी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अंती लकी ड्रॉ च्या माध्यमातून आणि खेळात विजयी झालेल्या महिलांना अनुक्रमे सोन्याची नथ आणि पैठणी देण्यासाठी तिन्ही पक्षातील उपस्थित मान्यवरांना व्यासपीठावर बोलवण्यात आले. मात्र, यावेळी सूत्रसंचालन करत असणारे शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांनी नेरुळ वॉर्ड क्रं. ८७ च्या त्याक्षणी उपस्थित असलेल्या एकमेव शिवसेना नगरसेविका सुनीता मांडवे यांना व्यासपीठावर येण्यासाठी निमंत्रित केले नाही. याबाबतची चर्चा उपस्थित महिला वर्गात होताच सुनीता मांडवे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सूत्रसंचालन पुरुषाने का करावे त्यांचे काय काम? आणि शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा जर का असा जाहिररीत्या शिवसेनेच्याच जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून अवमान होत असेल, तर सामान्य महिला पदाधिकाऱ्यांना कशी वागणूक मिळत असेल आदी प्रश्न चर्चेत आले आहेत. याबाबत विजय माने यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तर आमचे नाव न घेतल्याने त्याबाबत नाराजी वगैरे काही नाही, अशी प्रतिक्रिया सुनीता मांडवे यांनी व्यक्त केली.
भावोजीच्या खेळात शिवसेना नगरसेविकेचाच अवमान