कार्ला एकविरा मंदिर सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा


  • आ.मंदा म्हात्रे यांच्या मागणीची दखल


नवी मुंबई (प्रतिनिधी) - कार्ला गड येथील एकवीरा देवी आगरी कोळी समाजाची कुलदैवत असून राज्यातून असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र तेथील असुविधांबाबत शासनाचे लक्ष वेधतानाच परिसर सुशोभिकरणाची मागणी केली होती. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत महत्वाच्या पायाभूत सोयी सुविधा करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे कार्ला एकविरा मंदिर सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आ. मंदा म्हात्रे यांनी दिली. कार्ला गडावरील लेणी पाहणे तसेच एक वीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना पायऱ्या चढून वर जावे लागते; काही ज्येष्ठ भाविकांना वयोमानानुसार जमत नसल्याने ते आई एकवीरा मातेचे दर्शन घेऊ शकत नाहीत. याची दखल घेत आई एकवीरा माता मंदिराच्या सुशोभीकरणाचा व सोयी सुविधांचा विषय हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात पुरवणी मागण्याद्वारे मांडला होता. एकवीरा आईच्या मंदिरात जाण्याकरिता रोपवे बरोबरच _जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी आदी मांडले होते. मंदिर परिसरात सुविधा निर्माण करणे व सुशोभिकरणासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विधीमंडळाच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीदरम्यान केल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान, याप्रश्नी सरकारकडे पाठपुरावा केला असून राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आईएकवीरा माता मंदिराचे सुशोभीकरण आणि इतर महत्वाच्या पायाभूत सोयी सुविधा करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे कार्ला एकविरा मंदिर सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे, असल्याचे आ. मंदा म्हात्रेम्हणाल्या.