उरण (प्रतिनिधी) - जेएनपीटीकडे गेल्या दहा वर्षांपासून प्रकल्पबाधित ११ ग्रामपंचायतींचा कोट्यवधींचा थकीत असलेला मालमत्ता कर त्वरित देण्यात यावा, अशी सूचना खा.श्रीरंग बारणे यांनी जेएनपीटी प्रशासनाला केली आहे. यावेळी येत्या महिनाभरात थकबाकी अदा करण्याचे आश्वासन जेएनपीटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. खा.श्रीरंग बारणे सध्या मावळ मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून आपल्या मतदारसंघातील समस्यांचा आढावा ते नागरिकांकडून घेत आहेत. जेएनपीटीकडे प्रकल्पबाधित ११ __ग्रामपंचायतींचा कोट्यवधींचा मालमत्ता कर थकीत आहे. मालमत्ता कराअभावी या अकराही ग्रामपंचायतींचा विकास खंटला आहे. मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची रक्कम अदा करण्याची मागणी संबंधित ११ ग्रामपंचायतीकडून केली जात आहे. मात्र विविध कारणे पुढे करून जेएनपीटी मालमत्ता कर देण्यास चालढकलपणा करीत आली आहे. मालमत्ता कराची रक्कम तत्काळ अदा करण्यात यावी यासोबतच यावेळी विविध समस्यांवरही चर्चा झाली. त्याचबरोबर उरण तालुक्यातील ऐतिहासीक द्रोणागिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी जेएनपीटी प्रशासनाकडून विशेष रक्कम महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्द करण्यात यावी याबद्दलही चर्चा करण्यात आली.
जेएनपीटीने थकवला प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींचा कोट्यवधींचा कर