एपीएमसी मार्केटमधून ५४५ किलो प्लास्टिक साठा जप्त


तुर्भे (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे व वाशी येथील घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधीकारी यांच्या संयुक्त पथकाने काल एपीमसी मार्केट परिसरात प्लास्टिक व थर्माकोल विक्री करणा-या व्यापा-यांवर धडक कारवाई करून एकूण ५४५ किलो इतका प्लास्टिकचा साठा जप्त करून ८५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. दरम्यान, या कारवाईत बंदी असलेले प्लास्टिक मिळून आलेल्या ७ दकानदारांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळेबेकायदा प्लास्टिक व थर्माकोल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. राज्यात प्लास्टिकबंदी लागू होऊन वर्षभराहून अधिक कालावधी उलटला आहे. नवी मुंबईत प्लास्टिक वापर करणाऱ्याविरोधात अधून मधून कारवाईचा बडगा उगारला जात असला तरीही छुप्या पद्धतीने नवी मुंबई महापालिका हद्दीत विशेष करून एपीएमसी मार्केट परिसरात व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक व थर्माकोलची विक्री करण्याचे प्रकार सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व घनकचरा व्यवस्थापन विभागास मिळाली होती. या माहितीनुसार या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली असता, मोठया प्रमाणात येथील दुकानांमध्ये प्लास्टिकचा साठा असलेल्या गोण्या आढळून आल्यापथकाने हे सर्व प्लास्टिक जप्त केले आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत महाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डी.बी. पाटील, देशमुख यांच्यासह उपमुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे, निरीक्षक सुधीर पोटफाडेउपस्वच्छता निरीक्षक सुषमा पवार, काळे, खारकर व लवेश पाटील यांनी सहभाग घेतला.


box


 फेरीवाले मोकाट


महापालिकेच्या पथकाने मोठी कारवाई करत एपीमसी मार्केट परिसरातुन सुमारे दिड टन इतका प्लास्टिकचा साठा जप्त केला असला तरी आजही शहराच्या विविध भागात असलेले फेरीवाले व दुकानदार सर्रासपणे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसतात. त्यामुळे या फेरीवाल्यांवर व दकानदारांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.