नवी मुंबई (प्रतिनिधी) - घणसोली एमआयडीसी भागात झेड.एम.इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर धाड टाकत एक टन प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. सदर कंपनीकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले १ टन प्लास्टिक क्षेपणभूमी येथे खाली करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र पोलूशन नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डी.बी.पाटील, सब रिजनल ऑफीसर डॉ.गंधे, क्षेत्र अधिकारी मिलिंद ठाकुर, घणसोली विभाग सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, उप मुख्य स्वच्छता अधिकारी (परि-२) जुईकर, स्वच्छता निरिक्षक रत्नमाला नाईक, सरिता सालदर यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबईत स्वच्छ भारत अभियाना बरोबरच प्लास्टिक वापरावर निर्बंध घालण्यात येत आहेमहापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशानुसार शहर आणि एमआयडीसी परिसरात धडक मोहिम राबविण्यात येत असून महापालिकेचे पथक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टिक जप्तीची कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच तुर्भे येथूनही प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली होती.
घणसोली एमआयडीसीतून एक टन प्लास्टिक साठा जप्त