आमदारांच्या वाहन कर्जावरील व्याज आता सरकार भरणार


मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील आमदारांच्या खासगी वाहनावरील ड्रयव्हरच्या वेतनात वाढ करत त्यांचा खर्च सरकारी तिजोरीतून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदारांना नवे वाहन खरेदी करण्यासाठी ३० लाख रूपयांपर्यंतचा निधी वाढविण्यात आला असून त्यावरील व्याजाची रक्कम सरकार भरेल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत काल केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी वरील घोषणा केली. जे जूने आमदार आहेत. त्यातील अनेकांकडे स्वतःची वाहने आहेत. मात्र जे नवे आमदार आहेत, त्यांच्याकडे स्वतःचे वाहन असायला हवे. त्यामुळे ३0 लाख रूपयांपर्यंतचा निधी त्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यापूर्वी आमदारांच्या वाहनासाठी १० लाख रुपयांपर्यंतचा निधी देण्याची तरतूद होती. त्यात आता वाढ करत हा निधी ३० लाख रूपयांपर्यंत वाढविण्यात आला असून त्यावरील व्याज राज्य सरकार भरेल असे सांगत आमदारांनी फक्त मुद्दलाची रक्कम भरायची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.