आ.रमेशदादा पाटील यांची शासनाकडे मागणी... एकवीरा देवीचे दर्शन टोल मुक्त करा!


मुंबई (प्रतिनिधी) - कोळी व आगरी समाजाचे मानस दैवत असलेल्या लोणावला - कार्ला येथील आई एकविरेच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना राष्ट्रीय महामार्गावर अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असललेल्या ३ टोलनाक्यांवर भरावा लागणारा टोल शासनाने माफ करीत एकवीरा देवीचे दर्शन टोल मुक्त करा, अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष आ.रमेशदादा पाटील यांनी शासनाकडे केली आहे. राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरु असून काल आ.रमेशदादा पाटील यांनी विधानपरिषदेत ही मागणी केली. यावेळी सभागृहाने टाळ्या वाजवुन या सूचनेला समर्थन दिले. सद्यस्थितीत लोणावळा येथील कार्ला एकवीरा देवी दर्शनासाठी जातांना भाविकांच्या वाहनांना लोणावळाजवळील बेहरगाव येथील टोल नाका, त्याचबरोबर द्रतगती मार्गावरील खालापूर टोल नाका, वसैली हद्दीतील कुसगाव टोल नाका व पुढे एक किलोमीटर अंतरावर असलेला पुन्हा वरसोली टोल नाका अशा फक्त तीन किलोमीटर अंतरासाठी तीन वेळा अतिरिक्त टोल भरावा लागत आहे. त्यामुळे एकविरा देवीच्या दर्शनाला जाणा-या भाविकांसाठी या टोलमधून सूट द्यावीएकवीरा देवीचे दर्शन टोल मुक्त कराअशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष आ.रमेशदादा पाटील यांनी सूचनेद्वारे शासनाकडे केली. कार्ला एकवीरा देवी दर्शनासाठी जातांना पुणेमुंबई महामार्गावरून कार्ला रोडवर वेहेरगाव ग्रामपंचायतीची पावती देखील फाडावी लागत आहे, असे सांगत आ. रमेशदादा पाटील यांनी या टोलधाडीमुळे भाविकांना नाहक त्रास होत असल्याने ही आर्थीक लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी केली. याबरोबरच वरसोली टोल नाका येथुन हलविण्यात यावा आणि आई एकवीरा देवीचे दर्शन टोलमुक्त करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली, दरम्यान, आ.रमेशदादा पाटील यांनी केलेली मागणी पूर्ण झाल्यास आगरी कोळी बांधव आणि एकवीरा देवी भाविकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना श्री एकवीरा देवीच्या भक्त आणि मुंबई महापालिकेच्या नगरसेविका रजनी केणी यांनी व्यक्त केली आहे.