नवी मुंबईतील प्रश्न, समस्या मार्गी लावा


आ.मंदा म्हात्रे यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश...


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील विविध प्रश्न, नागरिकांच्या समस्या व अनेक प्रलंबित मागण्या मार्गी लावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच विधानभवनातील मुख्यमंत्री समिती कक्षात ठाणे जिल्हा आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नवी मुंबईतील विविध प्रश्न, नागरिकांच्या समस्या व अनेक प्रलंबित मागण्या आ.मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केल्या. यावेळी नवी मुंबईच्या प्रलंबित मागण्या, विविध समस्या व प्रश्न यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आ.मंदा म्हात्रे यांना दिल्याने नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून, नवी मुंबईतील सिडको अखत्यारीतील घरांचा फ्री होल्ड शासन निर्णय लवकरच निघणार आहे. तसेच वाशी येथील एपीएमसी संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याबरोबरच नवी मुंबईतील पोलिसांच्या घरांची पुनर्बाधणी व पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी पुनर्विकास योजना प्रकल्प अणि मरिना प्रकल्पाचे टेंडर लवकरच निघणार असल्याने हे प्रश्न मार्गी लागतील, अशी माहिती आ.मंदा म्हात्रे यांनी या बैठकीनंतर दिली.