कर्मचाऱ्यांअभावी पनवेल वाहतूक शाखेची टोईंग व्हॅन रस्त्यावर पडून!


पनवेल (प्रतिनिधी)- पनवेल शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी टोईंग व्हॅनचा वापर करण्यात येत आहे. परंतु त्या टोईंग व्हॅनवर काम करणारे कर्मचारीच गेल्या काही दिवसापासून काम सोडून गेल्याने ही टोईंग व्हॅन कर्मचान्यांच्या प्रतिक्षेत उभी आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोहिते यांनी पनवेल शहराला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी टोईंग व्हॅन उपलब्ध करून दिली. यासाठी वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी व काही खाजगी कर्मचाऱ्यांची रस्त्यावरील नो पाकीगमध्ये उभी करण्यात येणारी दुचाकी वाहने उचलण्यासाठी तसेच चारचाकी वाहनांच्या टायरला _जामर लावण्यासाठी नियुक्ती केली होती. व त्यांना रोजचा पगार दिला जात असे. परंतु या टोईंग व्हॅनचा अनियमितपणा, कामाचा वाढता लोढ, नागरिकांचा रोष, वेळप्रसंगी खाव्या लागणाऱ्या नागरिकांच्या शिव्या व मार यामुळे या टोईंग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी पळून गेले आहेत. _नव्याने कर्मचारी येथे उपलब्ध झाले नसल्याने सध्या तरी टोईंग व्हॅन शिवाजी चौकात रस्त्यावर उभी ठेवण्यात आली आहे. तसेच काही दिवसातच खारघर येथून नवीन कर्मचारी उपलब्ध होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून सांगण्यात आली आहे.