मुंबई (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलताना कोरोना संसर्गाला फार गांभीर्याने घेऊ नका अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्या डॉक्टरला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) नोटीस पाठवली आहे. दादरमधील डॉ. अनिल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखतीत बोलताना कोरोनाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगत चुकीची माहिती दिली होती. याची दखल घेत त्यांना एमएमसीने नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे. एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, एमएमसी नोंदणीकृत डॉक्टर राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या शिफारशी आणि मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात बोलू शकत नाही. आम्ही डॉ. पाटील यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यावर समाधान न झाल्यास एमएमसीच्या संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर अशी नोटीस पाठवण्याचा पहिलाच प्रकार असून, आवश्यक ती पदवी नसतानाही पाटील स्वतःला आयर्वेदिक डॉक्टर का म्हणून घेतात यावर देखील एमएमसीने स्पष्टीकरण मागितलं आहे. पाटील यांची नोंदणी एमएमसीकडे एमबीबीएस पदवीधारक आहे. त्यानुसार त्यांनी व्यवसाय करायला हवा. डॉ. अनिल पाटील यांनी मुलाखतीमध्ये बोलताना काही अनैसर्गिक दावे केले होते. कोरोना संसर्गाबाबतची भीती निरर्थक आहे. हा संसर्ग उन्हाळ्यात टिकूच शकत नाही. कोरोना हे संकट नसून चीनची लहर आहे, ज्याचा उद्देश लस आणि मास्कची विक्री वाढवणं हा आहे. कोरोनाविषयी घाबरण्याची आवश्यकता नसून आपण लेखी द्यायला तयार असल्याचंही त्यांनी म्हणाले. डॉ.पाटील यांची ही बेजबाबदार मुलाखत सोशल मीडियामध्ये सगळीकडे व्हायरल झाली होती. त्यामुळे नागरिक ही मुलाखत पाहून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू शकतात अशी भीती प्रशासनाला होतीकोरोनाच्या बाबतीत एखाद्या डॉक्टरांनी चुकीची माहिती दिल्यास त्या बाबत प्रशासनाला कळवण्याचे आवाहन एमएमसीने केलं आहे.
कोरोनाला गांभीर्यानं घेऊ नका म्हणणाऱ्या डॉक्टरला नोटीस